नवी दिल्ली - बांगलादेश ५ ऑगस्टचा तो दिवस सहजपणे विसरू शकत नाही. त्याचदिवशी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारताकडे आश्रय घेतला. बांगलादेशातील बिकट परिस्थितीमुळे हसीना यांना देश सोडून पळून जावं लागले. त्यानंतर बांगलादेशात हिंदूंची घरे, मंदिरे यांना टार्गेट करण्यात आले. आता या संपूर्ण घडामोडीवर शेख हसीना यांनी गंभीर आरोप लावला आहे. सत्तेतून बाहेर पडताच मी आणि माझी बहीण शेख रेहाना यांच्या हत्येचं षडयंत्र रचण्यात आलं होते असा खुलासा त्यांनी केला.
शेख हसीना यांनी शुक्रवारी रात्री त्यांच्या बांगलादेश आवामी लीगच्या फेसबुकवर ऑडिओ संदेश पोस्ट केला आहे. त्यात त्या म्हणाल्या की, रेहाना आणि मी थोडक्यात वाचलो, मृत्यू आमच्या डोळ्यासमोर होता आणि आमच्याकडे फक्त २०-२४ मिनिटे बाकी शिल्लक होती. आमच्या हत्येचं षडयंत्र अनेकदा रचण्यात आले होते. २१ ऑगस्टला झालेल्या घटनेत वाचणे, कोटालीपारा इथं बॉम्ब स्फोटातून बचावणे आणि ५ ऑगस्टला जिवंत राहणे ही अल्लाहची इच्छा होती. जर अल्लाहची इच्छा नसती तर आतापर्यंत मी जिवंत राहिली नसती असं त्यांनी सांगितले.
तसेच मला कशाप्रकारे मारण्याचा डाव रचला होता ते सगळ्यांनी पाहिले. अल्लाहच्या कृपेने मी वाचले. मी पीडित असून माझ्या देशाविना, घराविना राहत आहे. सर्व काही जाळून टाकले असंही भावूक होत शेख हसीना यांनी म्हटलं. शेख हसीना यांची सुरक्षा व्यवस्था चोख असतानाही अनेकदा त्या हत्येच्या प्रयत्नातून वाचल्या. २००४ मध्ये ढाका ग्रेनेड हल्ला २१ ऑगस्ट २००४ रोजी पक्षाच्या दहशतवाद विरोधी रॅलीत झाला होता. त्यावेळी २४ लोक मारले गेले आणि ५०० हून अधिक जखमी होते. हा हल्ला संध्याकाळी ५ वाजून २२ मिनिटांनी झाला तेव्हा विपक्ष नेत्या शेख हसीना या २० हजारांच्या सभेला संबोधित करत होत्या. या हल्ल्यात हसीना या किरकोळ जखमी झाल्या.
कोटालीपारा इथं शेख हसीना यांना मारण्याचा आणखी एक प्रयत्न करण्यात आला ज्याचा उल्लेख त्यांनी ऑडिओ संदेशमध्ये केला. २१ जुलै २००० रोजी ७६ किलो आरडीएक्स बॉम्ब जप्त करण्यात आले होते आणि २ दिवसांनी कोटालीपूराच्या शेख लुत्फोर रहमान आयडिएल कॉलेजमधून ४० किलो आरएडीएक्स जप्त केले होते. ज्याठिकाणी आवामी लीगच्या अध्यक्षा आणि तत्कालीन विरोधी पक्षनेत्या शेख हसीना या २२ जुलैला रॅली करणार होत्या.
काय आहे प्रकरण?
मागील वर्षी बांगलादेशात आरक्षण प्रणाली रद्द करण्याच्या मागणीवरून आंदोलन उभं राहिले होते. बांगलादेशात १९७१ साली मिळालेल्या स्वातंत्र्यसंग्रमातील कुटुंबाला ३० टक्के सरकारी नोकरीत आरक्षण द्यावं याविरोधात हा मोर्चा होता. या आरक्षणविरोधी मोर्चाने देशात हिंसक रुप प्राप्त केले. त्यानंतर देशातील अवस्था इतकी बिकट झाली ज्यामुळे शेख हसीना यांना देशातून पळून भारतात आश्रय घ्यावा लागला. या हिंसक आंदोलनात ६०० हून अधिक लोक मारले गेले.