नवी दिल्ली : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. 'लँड फॉर जॉब' प्रकरणात लालू दोषी असल्याचे उघड झाले असून त्यांची आणि कुटुंबीयांची ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
जॉबसाठी जमीन प्रकरणात मोठी कारवाई करत ईडीने सोमवारी लालू कुटुंबाची ६ कोटींची मालमत्ता जप्त केली. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवर कथित 'जमिनीच्या बदल्यात नोकरी' घोटाळ्याची चौकशी सुरू आहे. सीबीआयच्या पथकाने याप्रकरणी लालू कुटुंबातील अनेक सदस्यांची चौकशी केली आहे.
"हे राजकीय षडयंत्र"
दरम्यान, लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. 'जमिनीच्या बदल्यात नोकरी'चे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. सीबीआयने यापूर्वी दोनदा या प्रकरणाचा तपास केला असून त्यांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. यानंतर सीबीआयने हे प्रकरण बंद केले होते. मग आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करून काय जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप कुटुंबीयांनी लगावला. 'लँड फॉर जॉब' अर्थात जॉबसाठी जमीन याप्रकरणी सीबीआयच्या टीमने मे महिन्यात देशातील ९ ठिकाणी छापेमारी केली होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?लालू प्रसाद यादव २००४ ते २००९ या कालावधीत रेल्वेमंत्री असतानाचे हे प्रकरण आहे. त्यांनी विकल्या गेलेल्या जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये केलेल्या नियुक्त्यांशी संबंधित त्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. याचाही तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने आपल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, भारतीय रेल्वेच्या नियमांचे आणि प्रक्रियेचे उल्लंघन करून रेल्वेमध्ये नियुक्त्या करण्यात आल्या. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.