पाटणा : पाकिस्तानचे जिहादी इंडिया आघाडीच्या नेत्यांना पाठिंबा देत आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. यावरून बिहारच्या माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेत्या राबडी देवी यांनी सोमवारी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आता पाकिस्तानात निघणार आहेत. पाकिस्तान-पाकिस्तान करत राहा. तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे पाकिस्तानी आहेत, ते भारतात येऊन स्थायिक झाले, असे राबडी देवी यांनी म्हटले आहे. याशिवाय, भारत सरकारच्या एजन्सी काय करत आहेत? पंतप्रधान नरेंद्र मोदी अयशस्वी झाले आहेत का? संपूर्ण देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. बिहारमध्ये महाआघाडीची लाट आहे, असे राबडी देवी यांनी सांगितले.
दरम्यान, नुकतेच इंडिया आघाडीच्या उमेदावर मीसा भारती यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. मीसा भारती म्हणाल्या की, एनडीए सरकारने आम्हाला कंदिलाच्या युगात नेले आहे, आमचे सरकार आल्यानंतर 200 युनिट वीज मोफत दिली जाईल. तुम्ही खेड्यापाड्यात गेलात तर महिला आणि इतर लोक खासगीकरणामुळे वीज बिल खूप जास्त येत असल्याचे सांगत आहेत.
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास आम्ही 200 युनिट वीज मोफत देणार आहोत, असे मीसा भारती म्हणाल्या. याचबरोबर, मणेरचे लाडू कोण खाणार आणि हवा कोण खाणार हे 4 जूनला कळेल, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले. तसेच, सर्व विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले जात आहे. गेल्या 10 वर्षांपासून जनतेची फसवणूक केली जात आहे. ना महागाई गेली ना बेरोजगारी गेली, असेही मीसा भारती यांनी सांगितले.