जयपूर - राजस्थानच्या राजकारणात सध्या मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. सचिन पायलट आणि मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यातील मतभेद आता पुन्हा चव्हाट्यावर आले आहेत. त्यातच मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्याबद्दल एक खळबळजनक दावा केला आहे. २०२० मध्ये जेव्हा काँग्रस सरकार अडचणीत आले तेव्हा माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या मदतीनेच आमचे सरकार वाचले असा दोवा त्यांनी केला आहे. तर गहलोत यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही असं सांगत वसुंधरा राजे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गहलोत यांनी धौलपूर येथील एका कार्यक्रमात हे विधान केले. अशोक गहलोत म्हणाले की, वसुंधरा राजे, शोभा रानी आणि कैलाश मेघवाल यांना माहिती होती की त्यांचा पक्ष राज्यातील सरकार पाडण्याची तयारी करत आहे. तेव्हा स्वत: वसुंधरा आणि कैलाश यांनी आम्ही कधीही जनतेने निवडून दिलेले सरकार पैशाच्या जोरावर पाडले नाही. अशी आमची संस्कृती नाही असं सांगत जे सरकार पाडण्यासाठी प्रयत्न करत होते त्यांची साथ दिली नाही असा दावा गहलोत यांनी केला.
गहलोत यांचे वक्तव्य एक षडयंत्र - वसुंधरा राजेत्याचवेळी भाजपाच्या दिग्गज नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी गहलोत यांचे विधान सपशेल खोटे असल्याचे म्हटले आहे. एका षड्यंत्राखाली हे वक्तव्य करण्यात आले आहे. माझा सर्वात जास्त अपमान कोणी केला असेल तर ती व्यक्ती म्हणजे गहलोत. २०२३ मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने ते अशी वक्तव्ये करत आहेत. अशोक गहलोत यांनी आपल्यावर खोटे आरोप केले आहेत, कारण त्यांना त्यांच्याच पक्षात बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. या बंडामुळे गहलोत बिथरले आहेत असं वसुंधरा राजे यांनी म्हटलं.
२०२० मध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांनी अशोक गहलोत यांच्या विरोधात बंडखोरी करत विरोधात भूमिका घेतली होती. पायलट यांच्यासोबत तेव्हा काँग्रेसचे १८ आमदार होते. त्यानंतर अशोक गहलोत सरकार पडेल असे वाटत होते. मात्र, अशोक गहलोत यांना सरकार वाचवण्यात यश आले.