“RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, आहे का हिंमत?”; भाजपचे काँग्रेसला खुले आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 03:30 PM2023-05-27T15:30:08+5:302023-05-27T15:32:05+5:30
Karnataka Politics: राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
Karnataka Politics: अलीकडेच झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपला पराभवाची चव चाखायला लावली. त्यानंतर आता २४ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. मात्र, अद्याप खातेवाटप झालेले नाही. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी वरिष्ठ आणि कनिष्ठ आमदारांना सम-समान संधी देत जातीय समीकरणही समतोलपणे साधले आहे, अशी चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजपने काँग्रेसला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, असे खुले आव्हान दिले आहे.
कर्नाटकचे मंत्री प्रियांक खर्गे यांच्या वक्तव्यानंतर कर्नाटकमध्ये राजकारण तापले आहे. प्रियांक खर्गे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. यातच आता RSS, बजरंग दलवर बंदी घालून दाखवा, आहे का हिंमत, अशी विचारणा माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केली आहे.
हिंमत असेल तर संघ, बजरंग दलावर बंदी घालून दाखवा
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी हिंमत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलावर बंदी घालून दाखवावी. त्यांना विकासापेक्षा सुडाचे आणि द्वेषाचे राजकारण महत्त्वाचे आहे. त्यांनी काहीही केले तरी आम्ही त्यास सामोरे जाण्यास तयार आहोत. ते आरएसएस आणि बजरंग दलावर बंदी घालण्याबाबत बोलत आहेत. त्यांना कोणत्याही संस्थांवर बंदी घालण्याचा अधिकार नाही, या विषय केंद्र सरकारचा आहे. हे सर्व माहिती असूनही ते तुष्टीकरणाचे राजकारण करत आहेत, असा आरोप बोम्मई यांनी केला.
दरम्यान, सिद्धरामय्या यांना विचारतो की यावर तुमचे काय मत आहे? तुम्ही तुमच्या मंत्र्याशी सहमत आहात का? राज्यातील जनतेला हे सर्व समजावून सांगावे. संघ परिवारावर कोणीही बंदी घालू शकत नाही. ज्यांना बंदी घालायची होती, त्यांना आधीच घरी पाठवले आहे. हे विधान आम्ही आव्हान म्हणून घेतो आणि त्याला राजकीयदृष्ट्या सक्षमपणे सामोरे जाऊ, असा एल्गार बोम्मई यांनी केला आहे.