वाराणसी - महिलांसोबत छेडछाड केल्याच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. अशीच एक घटना उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये घडली आहे. भाजपाच्या माजी आमदाराला विद्यार्थिनीची छेड काढणं चांगलंच महागात पडलं आहे. नागरिकांनी भाजपा नेत्याची यथेच्छ धुलाई केली असून त्याला कान पकडून माफी मागायला लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीत छेडछाडीच्या आरोपाखाली भाजपाच्या एका माजी आमदाराला लोकांनी मारहाण केली. तसेच घटनेनंतर कान पकडून माफी मागायला लावली आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
वाराणसीच्या चौबेपूर पोलीस ठाण्याचा हद्दीतील भगतुआ गावात ही घटना घडली आहे. एका इंटर कॉलेजचे चेअरमन आणि भाजपाचे माजी आमदार माया शंकर पाठक यांच्यावर एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य करण्याचा आरोप करण्यात आला आहे. पीडित विद्यार्थिनीने केलेल्या आरोपांची माहिती मिळताच तिचे कुटुंबीय प्रचंड चिडले. तसेच विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी कॉलेजमध्ये जाऊन भाजपाच्या माया शंकर पाठक यांना मारहाण केली आहे आणि याचा एक व्हिडीओ देखील तयार केला. वाराणसी पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.
माया शंकर पाठक वाराणसीमध्ये भाजपाचे आमदार होते. एमपी इन्स्टीट्यूट अँड कम्पूटर कॉलेज नावाने भगतुआ गावात इंटर कॉलेज चालवत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ हा दोन दिवसांपूर्वीचा असल्याचं म्हटलं जात आहे. भाजपाचे माजी आमदार आणि शाळेचे चेअरमन माया शंकर पाठक यांनी आपल्या कार्यालयात बोलावून एका विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. विद्यार्थिनीच्या नातेवाईकांनी भाजपा नेत्याच्या ऑफिसमध्येच त्याची धुलाई केली. त्यानंतर एका मैदानात खुर्चीवर बसवून मारहाण केली.
नातेवाईकांनी धू-धू धुतलं, सोशल मीडियावर Video व्हायरल
मारहाणी दरम्यान नेता वारंवार कान पकडून माफी मागताना व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. मात्र याप्रकरणी अद्याप कोणीच पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही, मात्र मारहाणीचा हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हाय प्रोफाईल प्रकरण असल्याकारणाने पोलिसांनी स्वत: या प्रकरणात तपास सुरू केला आहे. क्षेत्राधिकारी पिंडरा अभिषेक कुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप दोन्ही पक्षांमधून कोणीही तक्रार दाखल केलेली नाही. मात्र व्हिडीओतून सत्य समोर येईल. यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. माया शंकर पाठक 1991 मध्ये वाराणसीतील चिरईगाव विधानसभा भागात भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.