कानपूर – महोबामध्ये भाजपाचे माजी खासदार गंगाचरण राजपूत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून ग्रामीण भागातील स्थलांतर रोखण्यासाठी बुंदेलखंड वेगळं राज्य असणं गरजेचे आहे. स्वतंत्र राज्य निर्माण करण्यासाठी बुंदेल्यांकडून अनेक आंदोलन करण्यात आली. बुंदेलखंडातील लाखो लोक मजुरीसाठी गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब येथे जातात. जर बुंदेलखंडला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला तर बुंदेलखंडचे स्थलांतर थांबेल असा दावा त्यांनी पत्रात केला आहे.
माजी खासदाराने पंतप्रधानांना पाठवलेल्या पत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झांशीच्या मेळाव्यात केलेल्या भाषणाची आठवण करुन दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, जर बुंदेले झांशीमधील उमेदवाराला निवडून देतील तर बुंदेलखंड स्वतंत्र राज्य केले जाईल असं आश्वासन त्यांनी निवडणुकीवेळी दिलं होतं.
या पत्रात म्हटले आहे की, येथील लोकांनी बुंदेलखंडच्या एका जागेवर नाही तर सर्व जागांवर लोकसभा आणि विधानसभेचे उमेदवार जिंकून दिले. स्वतंत्र बुंदेलखंड राज्य निर्माण केल्याशिवाय येथे त्यांचा विकास होऊ शकत नाही असे पत्रात नमूद केले आहे.