उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये भाजपाच्या एका माजी खासदाराने पीजीआय रुग्णालयातील डॉक्टरांवर आपल्या मुलावर उपचार न केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. भैरो प्रसाद मिश्रा म्हणाले की, मी डॉक्टरांकडे विनवणी करत राहिलो पण त्यांनी उपचार केले नाहीत. वेळेवर उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाला.
डॉक्टरांनी आपल्या मुलाला हातही लावला नाही, असा आरोप मिश्रा यांनी केला आहे. मुलाच्या मृत्यूनंतर संतप्त माजी खासदार तिथेच बसून राहिले. यानंतर रुग्णालयाचे संचालक आणि सीईओ यांनी त्यांना कारवाईचे आश्वासन देत मुलाचा मृतदेह घेऊन घरी पाठवले. यानंतर रुग्णालयाच्या संचालकांनी एक समिती स्थापन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भैरो प्रसाद मिश्रा हे चित्रकूटचे रहिवासी आहेत आणि 2014 मध्ये भाजपाच्या तिकिटावर निवडणूक जिंकून बांदा लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. त्यांचा मुलगा प्रकाश मिश्रा किडनीच्या आजाराने त्रस्त असून त्याच्यावर पीजीआयमध्ये उपचार सुरू होते.
त्यांची तब्येत बिघडल्याने माजी खासदार रात्री 11 वाजता मुलासह आपत्कालीन वॉर्डात पोहोचले. तेथे तैनात असलेल्या आपत्कालीन वैद्यकीय अधिकाऱ्याने आपल्या मुलाला दाखल करून घेण्याची विनंती करूनही त्याला दाखल केले नाही, असा आरोप आहे.
मुलाच्या मृत्यूनंतर माजी खासदार संतापले
अवघ्या तासाभरात माजी खासदाराच्या मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे संतापलेल्या भैरो प्रसाद मिश्रा आपत्कालीन वॉर्डातच बसून राहिले. ही माहिती पीजीआयच्या संचालकांना दिल्यावर त्यांनी घटनास्थळ गाठून चौकशीचे आश्वासन दिले. यानंतर माजी खासदार आपल्या मुलाचा मृतदेह घेऊन घराकडे रवाना झाले.
चौकशीसाठी समिती स्थापन
पीजीआयचे संचालक डॉ आर के धीमान यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये डॉ.संजय राज, डॉ. डी. के. पालीवाल आणि डॉ. आर. के. सिंग यांचा समावेश आहे. त्यांना 48 तासांत अहवाल सादर करण्यास सांगितले असून त्यानंतर आरोपींवर कारवाई केली जाईल.