हायकोर्टाच्या न्यायाधीशांनी दिला राजीनामा; पुढील २ दिवसात भाजपात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2024 02:55 PM2024-03-05T14:55:17+5:302024-03-05T14:55:53+5:30
शिक्षक भरती घोटाळ्यासह अनेक प्रकरणात न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय दिले.
नवी दिल्ली - कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजीत गंगोपाध्याय यांनी मंगळवारी म्हणजेच आज आपल्या पदाचा राजीनामा दिला. गंगोपाध्याय यांनी आपला राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे पाठवला आहे. याशिवाय राजीनाम्याची प्रत मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि कोलकाता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश टीएस शिवग्ननम यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. लवकरच ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
शिक्षक भरती घोटाळ्यासह अनेक प्रकरणात न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय यांनी एकापाठोपाठ एक महत्त्वाचे निर्णय दिले. विशेष म्हणजे गंगोपाध्याय या वर्षी ऑगस्टमध्ये निवृत्त होणार होते मात्र त्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला. राजीनामा देण्यापूर्वी अभिजीत गंगोपाध्याय यांनी सोमवारी सांगितले की, मी न्यायाधीश म्हणून काम पूर्ण केले आहे. राजीनामा दिल्यानंतर भविष्यातील योजना उघड करणार असल्याचं त्यांनी सांगितले होते. परंतु काही वकील आणि याचिकाकर्त्यांनी त्यांना उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली.
#WATCH | Kolkata, West Bengal | Former Calcutta High Court judge Justice Abhijit Gangopadhyay says, "Maybe on 7th (March) in the afternoon. There is a tentative program, when I will join BJP." pic.twitter.com/IoMosl7PVJ
— ANI (@ANI) March 5, 2024
राजकारणात पाऊल टाकणार
न्यायालयात न्यायाधीश त्याच्यासमोर येणाऱ्या खटल्यांचा निपटारा करतात, तेही एखाद्या व्यक्तीने खटला दाखल केल्यास. पण मी आपल्या देशात आणि पश्चिम बंगालमध्येही खूप असहाय्य लोक मोठ्या संख्येने पाहिले आहेत. त्यामुळे अशा गरजू लोकांसाठी काहीतरी करायचं असेल तर त्यांच्यासाठी काम करण्याची संधी फक्त राजकीय क्षेत्रच देऊ शकते असा माझा विचार आहे असं अभिजित गंगोपाध्याय यांनी सांगितले होते.
२०१८ मध्ये न्यायाधीश म्हणून नियुक्ती
न्यायाधीश गंगोपाध्याय तेच आहेत ज्यांनी एकदा तपासाच्या संथ गतीबद्दल सीबीआयला फटकारले होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे तक्रार करण्याचे बोलले होते. ते नेहमीच सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या निशाण्यावर राहिले आहेत. अन्यायाविरुद्ध लढणारे न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख आहे. मग ते काँग्रेस असो, सीपीएम किंवा भाजपा. त्यांच्याबाबत कोणत्याही राजकीय पक्षाला संकोच नाही. आता त्यांच्या राजकारणातील स्वागतासाठी सर्वजण सज्ज झाले आहेत. हाजरा कॉलेजमधून कायद्याचे शिक्षण घेतलेले न्यायमूर्ती हे राज्य सेवेत अधिकारीही राहिले आहेत. २०१८ मध्ये कोलकाता उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२० मध्ये त्यांची नियुक्ती कायम करण्यात आली.
भाजपात प्रवेश करणार
राजीनामा दिलेले हायकोर्टाचे न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय हे येत्या ७ मार्च रोजी भाजपात प्रवेश करणार असल्याचं न्यायाधीशांनी सांगितले. कोलकाता होणाऱ्या संवाद कार्यक्रमात गंगोपाध्याय भाजपात सहभागी होतील असं बोललं जाते. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससोबत भाजपा लढू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. तमलुक लोकसभा मतदारसंघातून माजी न्यायाधीश निवडणूक लढवू शकतात. ही जागा तृणमूल काँग्रेसचा गड मानली जाते. २००९ पासून सातत्याने या जागेवर टीएमसीचा उमेदवार जिंकला आहे.