नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचे प्रदीर्घ आजारानंतर शनिवारी दुपारी येथे निधन झाले. स्वपक्षीयांप्रमाणेच विरोधी पक्षातील नेत्यांशीही स्नेहाचे संबंध असलेले आदरणीय व्यक्तिमत्त्व गमावल्याची हळहळ संपूर्ण देशात व्यक्त केली गेली. सुषमा स्वराज यांच्यानंतर पंधरा दिवसांत जेटलींच्या रूपाने दुसरा दिग्गज नेता हरपल्याने भाजपची फार मोठी हानी झाली. कित्येक दशकांचे घनिष्ट संबंध असलेला अनमोल मित्र हरपल्याचे दु:ख व्यक्त करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जणू लाखो देशवासीयांच्या शोकभावनाच शब्दांकित केल्या.
अरुण जेटली ६६ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी संगीता, विवाहित कन्या सोनाली जेटली-बक्षी व पुत्र रोहन असा परिवार आहे.रविवारी दुपारी ४ वाजता निगमबोध स्मशानभूमीत जेटली यांच्यावर संपूर्ण सरकारी इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात येतील. जेटलींच्या निधनाचे वृत्त कळताच मोदी यांनी फोन करून जेटलींच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. परदेश दौरा अर्धवट सोडून पंतप्रधानांनी मुद्दाम येऊ नये, असे जेटली कुटुंबीयांनी सुचविले. त्यामुळे पंतप्रधानांनीही आपला दौऱ्यातील कार्यक्रम पूर्ण करण्याचे ठरविले आहे.बरेच दिवस प्रकृती नाजूक असलेल्या जेटली यांना ९ आॅगस्ट रोजी श्वसनाचा त्रास होऊन अस्वस्थ वाटू लागल्याने येथील एम्स रुग्णालयात दाखल केले गेले होते. तेव्हापासून जेटली अतिदक्षता विभागात होते व वरिष्ठ डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.गेले काही दिवस त्यांना जीवरक्षक यंत्रणांवर (लाइफ सपोर्ट) ठेवण्यात आले होते. हळूहळू एकेक अवयव निकामी होत त्यांची प्रकृती अधिकच ढासळत गेली व त्यातच दु. १२.०७ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
तब्येत साथ न देण्याने जेटलींचा उदंड उत्साह व कामाचा उरक याला जराही बाधा आली नाही. गेल्या वर्षी इस्पितळातून घरी आल्यावर जंतुसंसर्ग टाळण्यासाठी डॉक्टरांनी लोकांमध्ये न मिसळण्याचा सल्ला दिला. तेव्हा जेटली यांनी वित्त आणि संरक्षण या दोन महत्त्वाच्या खात्याचे काम घरून केले होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकार आधीपेक्षा अधिक मताधिक्याने पुन्हा सत्तेवर आले, पण तब्येत साथ देत नसल्याने मला कोणत्याही खात्याची जबाबदारी सोपवू नका, असे त्यांनी स्वत:हून पंतप्रधानांना कळविले.अरुण जेटली टिष्ट्वटर आणि फेसबूक यासारख्या समाजमाध्यमांतून सरकार आणि पक्षाचे खंदे प्रवक्ते म्हणूम प्रभावी भूमिका इस्पितळात दाखल होईपर्यंत बजावत राहिले. मोदी सरकारने घेतलेल्या काश्मीरविषयक निर्णयाचे त्यांनी टिष्ट्वट करून स्वागत केले होते आणि सुषमा स्वराज यांच्या निधनानंतर टिष्ट्वटरवरूनच श्रद्धांजली वाहिली होती.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळापासून ते मोदी सरकारपर्यंत वित्त, संरक्षण, व्यापार, कंपनी व्यवहार, माहिती आणि प्रसारण अशी डझनभर खाती समर्थपणे हाताळणाºया जेटलींनी अनेक अडचणींच्या वेळी पक्ष आणि सरकारचे ‘तारणहार’ ही भूमिकाही तेवढ्याच प्रभावीपणे बजावली. काँग्रेसमध्ये प्रणव मुखर्जी यांना जे स्थान होते, तेच भाजपमध्ये जेटलींना होते, ही तुलना त्यामुळेच चपखल होती. मोदी यांचे भाजपच्या संघटनेत अमित शहा व सरकारमध्ये अरुण जेटली हे उजवे हातच होते.अप्रत्यक्ष कर व्यवस्थेचा आमूलाग्र चेहरामोहरा बदलणारी जीएसटी प्रणाली सर्वांना विश्वासात घेऊन यशस्वीपणे अंमलात आणणारे वित्तमंत्री या नात्याने जेटली यांनी देशाच्या इतिहासात कायमचे स्थान मिळविले.रेल्वेचा अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पात आणणे, १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प मांडणे आणि गरीब जनतेस जनधन खाती उघडण्यास लावणे हे त्यांच्या संकल्पना व प्रयत्नांचे फळ होते. मोदींनी जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे चातुर्याने समर्थन करणे व झालेल्या दुष्परिणामांतून अर्थव्यवस्थेस सावरणे याचे श्रेयही बव्हंशी जेटलींच्या पारड्यात जाते.
अरुण जेटली हे एक प्रथितयश वकील, उत्तम वक्ते, अतिशय चांगले प्रशासक आणि उत्कृष्ट संसदपटू होते. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांशी ते चांगल्या प्रकारे संवाद साधू शकत. ते भाजपचा आदरणीय व सुसंस्कृत चेहरा होते.- डॉ. मनमोहन सिंग,माजी पंतप्रधान