नवी दिल्ली : माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड दिल्लीत विशेष गरजा असलेल्या त्यांच्या दोन मुलींसाठी आरामदायक घर शोधण्यासाठी धडपडत आहेत. न्या.चंद्रचूड यांना ३० एप्रिल रोजी सरकारी निवासस्थान रिकामे करायचे आहे. ते म्हणाले की, 'आमच्या दोन सुंदर मुलींच्या विशेष गरजांसाठी घर मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक सार्वजनिक जागा सारखीच असते.'
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिव्यांगांप्रति दु:ख व्यक्त करताना माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले की, 'आपल्या समाजाने दिव्यांगांना अज्ञान व दडपशाहीची वागणूक दिली आहे.'
दोन्ही मुली आहेत दुर्मीळ आजाराने त्रस्त
न्यायमूर्ती चंद्रचूड आणि पत्नी कल्पना दास यांनी प्रियंका आणि माही या दोन मुलींना दत्तक घेतले आहे. मुलींना ‘नेमालाइन मायोपॅथी’ या दुर्मीळ आजाराने ग्रासले आहे.
आव्हानांबाबत केली चर्चा
मिशन ॲक्सेसिबिलिटीने आयोजित केलेल्या दिव्यांगांचे अधिकार आणि त्यापुढे काय? या चर्चेत न्या. चंद्रचूड यांनी दिव्यांग मुलींच्या दुर्मीळ आजाराच्या कारणांवर चर्चा केली. कुटुंबासमोरील आव्हानांबद्दल यावेळी त्यांनी चर्चा केली.
मुलींमुळे माझा पूर्ण दृष्टिकोनच बदलला
न्या. चंद्रचूड म्हणाले की, त्यांच्या मुलींनी त्यांच्या कुटुंबाचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, त्यांना शाकाहाराची ओळख करून दिली आहे.
प्राणी आणि पर्यावरणाबद्दल खोल आदर निर्माण केला आहे. केवळ या दृष्टिकोनातून, दिव्यांग व्यक्तींसाठी सर्वोच्च न्यायालयात ‘मिट्टी कॅफे’ सुरू झाला. अपंगत्व हा अडथळा नाही, हे आम्हाला दाखवायचे होते. ते सन्मानीय जीवन जगण्यास सक्षम आहेत, हे यातून दाखविण्याचा प्रयत्न होता.
दिव्यांगांना सवलत नव्हे, तर हक्क म्हणून सुविधा द्या
माजी सरन्यायाधीशांनी दिव्यांग-संबंधित प्रकरणांना प्राधान्य देण्यासाठी न्यायालयांना आवाहन केले. दिव्यांगांप्रति सहानुभूतीप्रत खंडपीठाची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.
दिव्यांग व्यक्तींना सवलत म्हणून नव्हे तर हक्क म्हणून सुविधा दिल्या जाव्यात. ते पूर्णतः दुर्लक्षित जीवन जगतात. दिव्यांग व्यक्तींच्या हक्क (आरपीडब्ल्यूडी) कायद्याचा पुनर्विचार करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.