रायपूर : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांची प्रकृती बिघडल्यामुळे शनिवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जोगी यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी अजित जोगी नाश्ता करत होते, त्यानंतर अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या अजित जोगी यांची पत्नी आणि कोटाचे आमदार रेणू जोगी व इतर रुग्णालयात उपस्थित आहेत.अजित जोगी यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे नारायण हॉस्पिटलचे संचालक डॉ. खेमका यांनी सांगितले. जोगी गंभीर असल्याचे समजताच त्यांच्या समर्थकांनी हॉस्पिटलबाहेर जमण्यास सुरुवात केली आहे. जोगी यांचा मुलगा आणि माजी आमदार अमित जोगी हे विलासपूरमध्ये असून रायपूरला येण्यासाठी निघाले आहेत.
दरम्यान, छत्तीसगडचेमुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी अमित जोरी यांच्याशी फोनवर चर्चा करून तब्येतीची माहिती घेतली. तसेच राज्य सरकारकडून चांगले उपचार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही त्यांनी सांगितले.
अजित जोगी हे भारतीय प्रशासकीय सेवेतून राजकारणात आले होते. सध्ये ते मारवाही मतदारसंघातून आमदार आहेत. २००० मध्ये राज्याची निर्मिती होताच ते पहिले मुख्यमंत्री बनले होते. २००३ मध्ये निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा पराभव केल्याने त्यांना सत्ता सोडावी लागली होती. नंतर २०१६ मध्ये त्यांनी काँग्रेसशी फारकत घेत नवीन पक्ष स्थापन केला होता.
नादखुळा...! वय वर्ष ५ अन् एसयुव्ही घेऊन खरेदी करायला निघाला लॅम्बॉर्गिनी