श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांना कोरोनाची लागण झाली आहे. फारुक अब्दुल्ला यांचे सुपुत्र ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, जोपर्यंत कुटुंबातील सर्वांची कोरोना चाचणी होत नाही, तोपर्यंत आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्या विलगीकरणात राहतील, असेही ओमर यांनी स्पष्ट केले. अब्दुल्ला यांनी याच महिन्यात कोरोना लसीकरणाचा पहिला डोस घेतला होता.
ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करुन म्हटले, माझे वडिल कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत, त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे, जोपर्यंत आम्ही कोरोना चाचणी करत नाहीत, तोपर्यंत आम्ही कुटुंबातील इतरही सर्वच सदस्य होम आयसोलेशनमध्ये राहणार आहोत. तसेच, गेल्या काही दिवसांत आमच्याशी संपर्कात आलेल्या सर्वच व्यक्तींनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असे आवाहनही ओमर अब्दुल्ला यांनी ट्विटच्या माध्यमातून केलं आहे.
सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट जाणवत असून दिवसला 50 हजारांपेक्षा बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यापैकी, जवळपास 30 हजारांपेक्षा अधिक रुग्ण एकट्या महाराष्ट्रात आढळत आहेत. त्यामुळे, देशभरातून कोरोना नियमावलींचे पालन करण्याचे बजावण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच, गरज पडल्यास राज्यात लॉकडाऊन करण्यात येईल, असा इशाराही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
काश्मीरमध्ये कोरोना
जम्मू आणि काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाचे 235 रुग्ण पाझिटीव्ह आढळून आले आहेत. तर, 126 जणांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे, राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 1 लाख 30 हजार 228 पर्यंत पोहोचली आहे. तर, आजपर्यंत 1 लाख 26 हजार 129 जणांनी कोरोनावर मात दिलीय. कोरोनामुळे 1989 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 2 हजार 110 जणांवर कोरोनाचे उपचार सुरु आहेत.