हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते वीरभद्र सिंह (Virbhadra Singh) यांचे ८७ व्या वर्षी निधन झाले. प्रदीर्घ आजारामुळे गुरुवारी पहाटे 3.40 वाजता शिमल्याच्या इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (आयजीएमसी) मध्ये अखेरचा श्वास घेतला. (Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh dies at 87)
वीरभद्र सिंग गेल्या दोन महिन्यांपासून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते. त्यांनी दोनवेळा कोरोनावर मात केली होती. गेल्या दोन दिवसांपासून श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ते सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले होते. हिमाचलच्या राजकारणातील ते एक बडे प्रस्थ होते. वीरभद्र सिंह हे नऊ वेळा आमदार राहिले आहेत. तसेच पाचवेळा खासदार म्हणूनही निवडून आले होते. त्यांनी सहा वेळा हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पद सांभाळले. सध्या ते सोलन जिल्ह्यातील अरकी येथून आमदार होते.
वीरभद्र सिंह यांना बुधवारी दुपारी रामपूरयेथीन शिमल्याच्या आयजीएमसीमध्ये हलविण्यात आले होते. आयजीएमसीच्या डॉक्टरांनी सांगितले की, गेल्या काही काळापासून वीरभद्र यांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत होता, यामुळे त्यांना श्वास घेण्य़ास त्रास होत होता.
वीरभद्र सिंह हे मनमोहन सिंगांच्या नेतृत्वात 28 मे 2009 केंद्रीय मंत्री देखील होते. ते पहिल्यांदा १९८३ मध्ये मुख्यमंत्री बनले होते. सलग दोन वेळा ते १९९० पर्यंत या पदावर होते. यानंतर १९९३ ते १९९८, २००३ ते २००७ आणि २०१२ ते २०१७ असे मुख्यमंत्री राहिले होते.