जयपूर - राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले, ते 93 वर्षांचे होते. सध्या त्यांच्या पत्नीवरही दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची देशभरात ओळख होती. पहाडिया यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरवरुन शोक व्यक्त केला आहे. कोविड 19 च्या संक्रमणामुळे पहाडिया आपल्यातून निघून गेले. त्यांच्या निधनाचे वृत्त अतिशय वेदनादायी आहे.
जगन्नाथ पहाडिया यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री, हरयाणाचे राज्यपाल आणि केंद्रीयमंत्री बनून अनेक वर्षे देशाची सेवा केली. देशातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक होते, असेही मुख्यमंत्री गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटलंय. पहाडिया यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख पचविण्याची ताकद मिळो, असे म्हणत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
एक दिवसाचा दुखवटा
जगन्नाथ पहाडिया यांच्या निधनानंतर राज्यात एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे, तिरंगा ध्वज अर्ध्यावर फडकणार आहे. सरकारी कार्यालयातही दुखवटा पाळण्यात येईल. तसेच, मंत्रिमंडळा बैठकीत पहाडिया यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.