चंदीगड : दिवाळीच्या मुहूर्तावर हरयाणामध्ये सगल दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ भाजपाचे नेते मनोहर लाल खट्टर यांनी घेतली. तसेच, मनोहर लाल खट्टर यांच्याशिवाय जननायक जनता पार्टी (जेजेपी)चे अध्यक्ष दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले. त्यामुळे भाजपाने जेजेपीचा पाठिंबा घेत सत्ता स्थापण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी आज शपथविधी सोहळा पार पडला. या शपविधी सोहळ्याला काँग्रेसचे नेता आणि माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंह हुड्डा सुद्धा उपस्थित होते. यावेळी भूपिंदर सिंह हुड्डा यांनी भाजपाला जेजेपीने दिलेला पाठिंबा म्हणजे मतदारांनी दिलेल्या कौलाचा अपमान असल्याचे सांगत जेजेपीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
भूपिंदर सिंह हुड्डा म्हणाले, "ही युती म्हणजे मतदान कोणाचे तरी आणि पाठिंबा कोणाला तरी या आधारावर बनली आहे. हे सरकार स्वार्थावर आधारित आहे. जेजेपीने जनतेच्या कौलाचा अपमान केला आहे. आमच्या पार्टीत झालेल्या बदलांमुळे आमच्याकडे कमी कालावधी होता. जर हे बदल आधीच झाले असते तर याचा परिणाम यापेक्षा वेगळा असता."
दरम्यान, मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तर दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. मनोहरलाल खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.
दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीचे समर्थन मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा दाखल केला होता. राज्यपालांनी त्यांना लगेचच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्याआधी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी खट्टर यांची एकमताने निवड करण्यात आली.