नवी दिल्ली : ‘पेगासस’ हेरगिरी म्हणजेच फोन टॅपिंग प्रकरणात दरराेज खळबळजनक माहिती समाेर येत आहे. या स्पायवेअरचा वापर करून दाेन कर्नल, सीमा सुरक्षा दलाचे माजी महासंचालक, अंमलबजावणी संचालनालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय तसेच ‘राॅ’चे माजी अधिकारी यांच्याही माेबाइलवर पाळत ठेवण्यात येत हाेती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय पंतप्रधान कार्यालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याचाही या यादीत समावेश असल्याची माहिती आहे.
‘पेगासस’चा वापर करून ५० हजार माेबाइल क्रमांकांवर पाळत ठेवण्यात येत हाेती. त्यात बीएसएफचे माजी महासंचालक के. के. शर्मा, ‘राॅ’चे माजी अधिकारी व्ही. के. जैन, ‘ईडी’चे माजी वरिष्ठ अधिकारी राजेश्वर सिंह यांच्यासह दाेन कर्नल दर्जाचे लष्करी अधिकाऱ्यांचा समावेश हाेता.
सिंह यांनी ‘२जी’ घाेटाळ्याची तसेच माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या भूमिकेबाबत चाैकशी केली हाेती, तर शर्मा यांनी २०१८ मध्ये पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमाला लष्करी गणवेशात हजेरी लावली हाेती. त्यावर तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला हाेता. याशिवाय सैनिक कल्याणाबाबत काम करणारे माजी कर्नल मुकुल देव यांच्यावरही पाळत ठेवण्यात येत हाेती.
फक्त मोदी सरकारच पेगासस प्रकरणाबाबत बेफिकीर -पी. चिदंबरमफोन टॅपिंगद्वारे झालेल्या हेरगिरीबाबत फक्त मोदी सरकारच बेफिकीर आहे अशी टीका माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांनी केली आहे. पेगासस प्रकरण अतिशय गांभीर्याने घेऊन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्यूएल मॅक्राँ यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी चर्चा केली होती.
चिदंबरम म्हणाले होते की, हेरगिरीची संयुक्त संसदीय समितीमार्फत किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी झाली पाहिजे. हेरगिरी झाली की नाही याविषयी पंतप्रधान मोदी यांनी संसदेमध्ये निवेदन करायला हवे.
इमॅन्यूएल मॅक्राँ यांचा मोबाइल फोन मोरोक्कोमधील सुरक्षा यंत्रणांनी पेगॅससचा वापर करून टॅप केला असल्याचा फ्रान्सला संशय आहे. त्यामुळे हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेऊन चौकशी करावी असे मॅक्राँ यांनी इस्रायलला सांगितले. याबाबत पी. चिदंबरम यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, फ्रान्समधील फोनचे टॅपिंग कसे झाले याची माहिती इस्रायलने आम्हाला दिली पाहिजे अशी मागणी मॅक्राँ यांनी केली. इस्रायलने या प्रकरणाची चौकशी करण्याचे मान्य केले आहे. जगात अशा घडामोडी होत असताना फोन टॅपिंगबाबत फक्त मोदी सरकार बेपर्वा वृत्तीने वागत आहे. या तंत्रज्ञानाद्वारे हेरगिरी झाली आहे याची मोदी सरकारला पूर्ण कल्पना आहे.
केंद्राने आरोपांचा केला होता इन्कारकाँग्रेसचे नेते राहुल गांधी, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा भाचा अभिषेक बॅनर्जी यांच्यासह काही राजकीय नेते, पत्रकार, उद्योजक अशा ३०० भारतीय नागरिकांच्या फोनचे पेगॅससद्वारे टॅपिंग करण्यात आले होते. ही माहिती उजेडात येताच त्यावरून विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर कडक टीका केली; मात्र या हेरगिरीच्या आरोपांचा मोदी सरकारने इन्कार केला होता.