Ghulam Nabi Azad: “आम्ही भाजपची बी-टीम नाही, गुलाम नबी आझाद जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील”
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 02:12 PM2022-08-27T14:12:04+5:302022-08-27T14:13:20+5:30
गुलाम नबी आझाद नवीन पक्ष स्थापन करुन भाजपसोबत युतीत पुढील विधानसभा निवडणूक लढवतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जम्मू: महाराष्ट्रात एकीकडे शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्ष तीव्र होत असताना दुसरीकडे काँग्रेसला राष्ट्रीय स्तरावर मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. जम्मू-काश्मीरमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आझाद नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले जाते. आझाद यांनी पक्ष सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरचे माजी युवा काँग्रेस अध्यक्षांनी, गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील, असे दावा केला आहे.
जम्मू-काश्मीरचे माजी युवा काँग्रेस अध्यक्ष आणि माजी आमदार अमिन भट यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त केली. आम्ही पुढील वाटचालीसंदर्भात चर्चा चर्चा केली. आम्ही भाजपाची बी टीम नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच गुलाम नबी आझाद जम्मू आणि काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. भट यांनी गुलाम नबी आझाद यांची भेट घेतली. आझाद हे नवीन पक्ष स्थापन करणार असून ते भाजपासोबत युती करुन पुढील विधानसभा निवडणूक लढवतील असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.
राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी
रिमोट कंट्रोल पद्धतीने यूपीए सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली होती, आता काँग्रेसमध्येच हा प्रयोग केला जात आहे. सोनिया गांधी या केवळ नामधारी अध्यक्ष असून सर्व निर्णय राहुल गांधी वा त्यांचे सुरक्षारक्षक किंवा खासगी सचिव घेत आहेत, असे टीकास्त्र गुलाम नबी आझाद यांनी सोडले. राहुल गांधी अधिकृत पक्षाध्यक्ष नसले तरी, त्यांच्या संमतीशिवाय पक्षात कोणतेही निर्णय घेतले जात नसल्याची तक्रार ज्येष्ठ नेते सातत्याने करत आहेत. अन्य नेत्यांप्रमाणे राहुल गांधींच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त करून गुलाम नबी आझाद यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली.
दरम्यान, संघटनात्मक बदल करण्याबरोबरच पक्ष कार्यकर्त्यांसाठी पूर्णवेळ उपलब्ध अध्यक्ष नियुक्त करण्याची मागणी ‘जी-२३’ गटाने केली होती. सोनिया गांधी यांना ऑगस्ट २०२० मध्ये लिहिलेल्या पत्रानंतर बंडखोर गटाचा पक्षांतर्गत संघर्ष सुरू होता.