नवी दिल्ली : देशात आगामी लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या लोकसभा निवडणुकीपूर्वी नेत्यांकडून पक्षांतर सुरु झाले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार राजेश मिश्रा यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. वाराणसी लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजेश मिश्रा यांना भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद आणि अरुण सिंह यांनी पार्टीचे सदस्यत्व दिले.
भदोही लोकसभा मतदारसंघातून राजेश मिश्रा निवडणूक लढवू शकतात, असे म्हटले जात आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर राजेश मिश्रा म्हणाले की, यावेळी वाराणसी लोकसभा जागेवर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला पोलिंग एजंट मिळणार नाही, यासाठी माझा प्रयत्न असणार आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीचे खासदार आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे, असे राजेश मिश्रा यांनी सांगितले.
याचबरोबर, नरेंद्र मोदी यांनी जगभर देशाचा गौरव केला आहे, असे म्हणत राजेश मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले, तसेच. राजेश मिश्रा म्हणाले की, उत्तर प्रदेशातकाँग्रेसने समाजवादी पार्टीसमोर शरणागती पत्करली आहे. निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारही नाहीत. तसेच, राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेवरही प्रश्न उपस्थित करत जातीचा मुद्दा उपस्थित करणे योग्य नसल्याचे राजेश मिश्रा यांनी सांगितले.
दरम्यान, राजेश मिश्रा 2004 ते 2009 दरम्यान वाराणसीचे खासदार होते. अजय राय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतरच राजेश मिश्रा यांनी पक्षावर प्रश्न उपस्थित केले होते. मिळालेल्या माहितीनुसार, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजेश मिश्रा हे काँग्रेसकडून भदोही मतदारसंघातून तिकीट मागत होते, पण समाजवादी पार्टीसोबत युती केल्यामुळे ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली नाही.