नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी खासदार आणि अमेठीमधील बलाढ्य नेते संजय सिंह यांनी अखेर आज भाजपामध्ये प्रवेश केला. संजय सिंह यांच्यासोबत त्यांची पत्नी अमिता सिंह यांनीसुद्धा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असलेल्या अमेठीमध्ये संजय सिंह यांची चांगली पकड असल्याने त्यांचे पक्ष सोडून जाणे हे काँग्रेससाठी मोठा धक्का मानले जात आहे.
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत संजय सिंह यांनी सुल्तानपूर लोकसभा मतदारसंघातून मनेका गांधी यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. गांधी कुटुंबाचे निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या संजय सिंह यांना काँग्रेसने आसाममधून राज्यसभेवर पाठवले होते. 1980 मध्ये जेव्हा संजय गांधी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हा संजय सिंह यांनी त्यांना पाठिंबा दिला होता. अमेठी मतदारसंघात भक्कम जनाधार असलेल्या संजय सिंह यांनी याआधीही एकदा काँग्रेस पक्ष सोडला होता. मात्र यावेळी आपण पूर्ण विचार करून पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्यांनी काल सांगितले होते. ''गेल्या 15-20 वर्षांपासून काँग्रेसमध्ये विसंवादाची स्थिती निर्माण झाली आहे. आज घडीला संपूर्ण देश मोदींसोबत उभा आहे. त्यामुळे जर देश मोदींसोबत असेल तर मीसुद्धा त्यांच्यासोबत आहे.''