माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांचा मुलगा करण सिद्धू विवाहबंधनात अडकला. गुरूवारी त्याने सातफेरे घेतले. सिद्धू यांनी लग्नाची झलक सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. सिद्धू यांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये नवज्योत सिंग सिद्धू, करण सिद्धू आणि वधू इनायत रंधावा दिसत आहे. लग्नाशी संबंधित एक व्हिडीओ देखील समोर आला आहे, ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू डान्स करताना दिसत आहेत.
दरम्यान, या वर्षी जूनमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी इनायत रंधावाची ओळख करून दिली होती. सिद्धू यांनी आपल्या कुटुंबीयांसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. खरं तर पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष अर्थात सिद्धू म्हणाले होते की, त्यांच्या मुलाने गंगा नदीच्या काठावर आपल्या होणाऱ्या पत्नीला सात जन्म सोबत राहण्याचे वचन देवून आपल्या आईच्या इच्छेचा सन्मान केला. इनायत ही पटियाला येथील रहिवासी आहे. पटियालामधील प्रसिद्ध नाव असलेल्या मनिंदर रंधावा यांची ती मुलगी आहे. त्यांनी सैन्यात सेवा बजावली आहे.
करण सिद्धूबद्दल भाष्य करायचे झाले तर, तो पेशाने वकील आहे. त्याने एमिटी विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच न्यूयॉर्कमधील बेंजामिन एन. कार्डोझो स्कूल ऑफ लॉमधून मास्टर ऑफ लॉ पदवी प्राप्त केली. दहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा भोगल्यानंतर २ एप्रिल २०२३ रोजी काँग्रेस नेते सिद्धू यांची जेलमधून सुटका करण्यात आली. ५९ वर्षीय नवज्योत सिंग सिद्धू रोड-रेज घटनेत शिक्षा भोगत होते, ज्यात ३४ वर्षांपूर्वी गुरनाम सिंग या ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला होता.
काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसरमधून खासदार राहिले आहेत. ते पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच माजी क्रिकेटपटूही राहिले आहेत. नवज्योत सिद्धू यांच्या पत्नीचे नाव डॉ.नवज्योत कौर सिद्धू आहे. राबिया सिद्धू असे मुलीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू याही राजकारणी राहिल्या आहेत.