नवी दिल्ली - बिहारमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांनी विविध यात्रा काढून राज्यात मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव देखील जनतेत सामील होताना दिसत आहेत. हे सगळ करत असताना तेजस्वी यांना आपलं पहिलं प्रेम आठवलं. ते म्हणजे क्रिकेट, मग काय माजी क्रिकेटपटू तेजस्वी यांनी राजकारण बाजुला ठेवून क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला.
बिहारमधील एका पशुवैद्यकीय महाविद्यालयात काही युवक क्रिकेट खेळताना तेजस्वी यांना दिसले. मग काय, तेजस्वी यांनी त्यांच्यात जावून क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला. अनेक वर्षांपासून तेजस्वी राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्यामुळे त्यांना क्रिकेट खेळण्याची फारशी संधी मिळत नाही. मात्र त्यांनी क्रिकेट खेळून आपली इच्छा पूर्ण केली.
राजकारणात येण्यापूर्वी तेजस्वी क्रिकेटपटू होते. ते यष्टीरक्षणासह मध्यमगती गोलंदाजही आहेत. आयपीएलच्या चार हंगामात तेजस्वी यादव यांनी दिल्ली डेअरडेव्हिलस संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आहे. त्यामुळे क्रिकेट खेळताना युवकांना पाहिल्यानंतर तेजस्वी स्वत: ला क्रिकेट खेळण्यापसून रोखू शकले नाही. तेजस्वी यांनी फलंदाजी करताना शानदार शॉट लगावले. त्यांचा फलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.