नवी दिल्ली : माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते.
गेल्या काही दिवसांपासून जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना अल्झायमर नावाचा दुर्धर आजार झाल्याचे निदान झाले होते. मात्र, मंगळवारी सकाळी सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जॉर्ज फर्नांडिस हे भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला होता.
जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967 मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मात्र 1971च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंदिरा गांधी सरकारला त्यांनी कडाडून विरोध केला होता. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एकमेव रेल्वे कर्मचारी संपाचे त्यांनी नेतृत्व केले.
आणीबाणीच्या काळात त्यांनी तुरुंगवासही भोगला. 1977 साली मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या जनता सरकारमध्ये त्यांनी उद्योगमंत्रिपद भूषवले. जुलै 1979 मध्ये लोकसभेत काँग्रेस नेते यशवंतराव चव्हाण यांनी मांडलेल्या अविश्वास ठरावावर त्यांनी जनता सरकारच्या बाजूने प्रभावी भाषण केले, पण दुसऱ्या दिवशीच पंतप्रधान मोरारजी देसाईंच्या नेतृत्वावर आपला विश्वास नसल्याचं सांगत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
जॉर्ज साहेबांनी भारताच्या सर्वोत्तम राजकीय नेतृत्वाचे प्रतिनिधित्व केले. सरळ आणि दूरदृष्टीने त्यांनी देशात योगदान दिले आहे. गरीब आणि अल्पसंख्याकांच्या हक्कांसाठी ते सर्वात प्रभावी आवाज होते. त्याच्या निधनानं अतीव दुःख झाले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे लोकशाहीचा खंदा समर्थक हरपला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली आहे.
जॉर्ज फर्नांडिस यांच्या निधनामुळे देशातील कामगारांसाठी प्राणपणाने झुंजणारा नेता हरपल्याची भावना सर्वच स्तरांतून व्यक्त होत आहे. याचबरोबर, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, शिवसेना नेते संजय राऊत यांनी दुःख व्यक्त केले आहे.