नवी दिल्ली: दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते मदनलाल खुराना यांचे शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास राहत्या घरीच निधन झाले. ते 82 वर्षांच होते. त्यांचा मुलगा हरिश खुराना यांनी ट्विट करून ही माहिती दिली.
मदन लाल खुराना हे मेंदूज्वरामुळे गेल्या काही वर्षांपासून कोमामध्ये गेले होते. तसेच त्यांच्या एका मुलाचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले होते. मदनलाल खुराना हे भाजपमधील मोठे नेते होते. दिल्लीच्या राजकारणात ते बऱ्याच काळापासून सक्रीय होते. 1993 ते 1996 या काळात ते दिल्लीचे मुख्यमंत्रीही राहिले होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबरला पाकिस्तानच्या फैलसाबादमध्ये झाला होता.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात खुराना संसदीय कार्यमंत्री आणि पर्यटन मंत्रीही राहिले होते. दिल्लीमधून ते चारवेळा संसदेवर निवडून गेले होते. अशी प्रदीर्घ राजकीय कारकीर्द लाभलेल्या खुराना यांना 2001 मध्ये राजस्थानच्या राज्यपालपदी नेमण्यात आले. मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे त्यांनी 2004 मध्ये राजीनामा देत पुन्हा सक्रीय राजकारणात परतावे लागले होते. ते भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षही होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली