नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शीला दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज सकाळी त्यांना एस्कॉर्ट रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांचं निधन झालं. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. सर्वाधिक काळ दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान दीक्षित यांच्याकडे जातो. १९९८ ते २०१३ या कालावधीत त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. गांधी कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्या अशी त्यांची ओळख होती. दीक्षित यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामं झाली. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत मेट्रो धावली.
काँग्रेसमधील सामर्थ्यशाली नेत्या समजल्या जाणाऱ्या शीला दीक्षित यांचा जन्म ३१ मार्च १९३८ मध्ये पंजाबमधील कपूरथलामध्ये झाला. दिल्लीतील कॉन्वेंट ऑफ जीसस एँड मेरी स्कूलमध्ये त्यांचं शालेय शिक्षण झालं. दिल्ली विद्यापीठाच्या मिरांडा हाऊस महाविद्यालयातून त्यांना एमएची पदवी घेतली. १९८४ ते १९८९ या कालावधीत त्यांनी लोकसभेत उत्तर प्रदेशच्या कन्नौजचं प्रतिनिधीत्व केलं. त्यानंतर पुढे त्या दिल्लीचा चेहरा झाल्या. दिल्लीतील अनेक विकासकामं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात झाली.