दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित अनंतात विलीन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 04:35 PM2019-07-21T16:35:11+5:302019-07-21T16:51:19+5:30
अंत्यसंस्काराला दिग्गज नेत्यांची उपस्थिती
नवी दिल्ली: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यावर दिल्लीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. निगमबोध घाटावर त्यांचा अंत्यविधी पार पडला. त्यावेळी अनेक दिग्गज नेते आणि मंत्री उपस्थित होते. दीक्षित यांना शेवटचा निरोप देण्यासाठी सर्वसामान्य दिल्लीकरांनी मोठी गर्दी केली होती. काल शीला दीक्षित यांनी एस्कॉर्ट रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर दिल्लीत दोन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला.
तब्बल १५ वर्षे दिल्लीचं मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या शीला दीक्षित यांना दिल्लीकरांनी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला. दीक्षित यांच्या पार्थिवावर निगमबोध घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते अहमद पटेल यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. शीला दीक्षित या केवळ नेत्या नव्हत्या. तर ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. त्यांची कमतरता कायम जाणवेल, अशा शब्दांमध्ये यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी त्यांच्या भावना बोलून दाखवल्या.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधींनी दीक्षित यांना श्रद्धांजली वाहिली. गेल्या काही दिवसांपासून दीक्षित यांची प्रकृती गंभीर होती. काल एस्कॉर्ट रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर त्यांचं पार्थिव निजामुद्दीन भागातील निवासस्थानी आणण्यात आलं. आज सकाळी अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव काँग्रेस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं.