Kailash Gahlot joins BJP : नवी दिल्ली : दिल्लीत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते आणि परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांनी काल, रविवारी (दि.१७) पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आपचा राजीनामा दिल्यानंतर कैलाश गेहलोत यांनी आज, सोमवारी ( दि.१८) भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कैलाश गेहलोत हे भाजपमध्ये सामील झाले.
कैलाश गहलोत यांनी रविवारी आपप्रमुख अरविंद केजरीवाल यांना खरमरीत पत्र लिहून पक्ष सोडण्याच्या कारणांचा पाढा वाचला होता. त्यात राजकीय महत्त्वाकांक्षेमुळे आप जनतेबद्दलची बांधिलकी विसरल्याचा आरोप कैलाश गहलोत यांनी केला होता. तसेच, शीशमहलचा मुद्दा उपस्थित करत कैलाश गहलोत यांनी अप्रत्यक्षरीत्या अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केले होते. आम्ही अजूनही स्वतःला सामान्य लोकांप्रमाणे समजतो का, असा सवाल करत कैलाश गहलोत यांनी तापलेल्या राजकारणाचा उल्लेख करत पक्षाच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त केली होती.
याचबरोबर, दिल्ली सरकार आपला बहुतांश वेळ केंद्र सरकारसोबत लढण्यामध्ये घालवत राहिलं तर दिल्लीची प्रगती होणार नाही. त्यामुळे माझ्याजवळ आपला सोडचिठ्ठी देण्याचा पर्याय उरलेला नाही. त्यामुळे मी आपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे कैलाश गहलोत यांनी सांगितले होते. दरम्यान, आपचा राजीनामा दिल्यानंतर कैलाश गेहलोत यांनी भाजपात प्रवेश केला आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत कैलाश गेहलोत भाजपमध्ये सामील झाले आहेत.