आगामी विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारण्यात आल्यानंतर भारत राष्ट्र समिती (BRS) नेते आणि तेलंगणाचे माजी उपमुख्यमंत्री थातिकोंडा राजैया खचून गेले आहेत. त्यांना अश्रू अनावर झाले आणि सर्वांसमोर ते ढसाढसा रडले. थातिकोंडा राजैया घनपूर स्टेशन विधानसभा मतदारसंघातून तिकिटाची मागणी करत होते, मात्र पक्षाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला आहे.
तेलंगणात या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची तारीख अद्याप ठरलेली नसली तरी आगामी निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच बीआरएस पक्षाने 21 ऑगस्ट रोजी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
वृत्तानुसार, थातिकोंडा राजैया यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या गावातील सरपंचाने लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. या आरोपांमुळे पक्षाने त्यांना तिकीट नाकारले आहे. घनपूर स्टेशन विधानसभा मतदारसंघातून कडियम श्रीहरी यांना पक्षाने तिकीट दिले आहे.
तेलंगणात सध्या बीआरएस पक्षाची सत्ता आहे. सीएम के. चंद्रशेखर राव (KCR) यांनी आगामी निवडणुकीत 95 ते 105 जागा जिंकण्याचं म्हटलं आहे. बीआरएसच्या यादीनुसार सीएम केसीआर गजवेल आणि कामारेड्डी येथून निवडणूक लढवणार आहेत.
सोमवारी पत्रकारांशी बोलताना बीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव म्हणाले होते की, "आम्ही 95 ते 105 जागा जिंकू असा आमचा अंदाज आहे. केवळ आमदारच नाही तर खासदारांच्या जागाही. आम्हाला 17 (लोकसभेच्या) जागा जिंकायच्या आहेत." असदुद्दीन ओवेसी यांच्या पक्ष एआयएमआयएमसोबत आमची मैत्री कायम राहील, असेही ते म्हणाले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.