कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र ही यादी जाहीर झाल्यापासून पक्षातच एक प्रकारचे राजकारण सुरू झाले आहे. अनेक नेत्यांमध्ये आक्रोश दिसत आहे. कुणी थेट पक्ष बदलण्याची भाषा करत आहेत, कुणी रडत आहेत, तर कुणी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीसंदर्भात बोलत आहेत. यामुळे भाजप समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत.
पहिली यादी जाहीर होताच भाजपत घमासान- कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने मंगळवारी 189 उमेदवारांची यादी जाहीर केली. ही यादी जाहीर होताच अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी भाजपने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावडी यांचेही तिकीट कापले आहे. यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यांना काँग्रेसमध्ये जाण्यासंदर्भात विचारले असता, लवकरच मोठा निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. आता महत्वाचे म्हणजे, यावेळी भाजपने अथनी येथून महेश कुमाथली यांना तिकीट दिले आहे. कुमाथली यांनीच 2019 मध्ये काँग्रेसचे सरकार पाडत भाजपचे सरकार स्थापन केले होते.
कुणाच्या डोळ्यात पाणी - भाजपने यावेळी उडपीचे आमदार रघुपती भट्ट यांनाही तिकीट दिले नाही. यामुळे ते भावूक झाले. महत्वाचे म्हणजे, हा निर्णय टीव्हीच्या माध्यमाने समजल्याने ते ते अधिक दुःखी झाले आहेत. ते म्हणाले, जर आपल्याला आपल्या जातीमुळे तिकिट दिले गेले नसेल, तर आपण हे स्वीकार करू शकत नाही.
ईश्वरप्पा यांच्या निवडणूक राजकारणातील निवृत्तीने टेन्शन वाढलं - पक्षाच्या अनेक नेत्यांनी स्वतःहून समोर येत राजीनामा दिला आहे. शिवमोगामध्ये तर राजीनाम्यांची लाईन लागली आहे. येथे महापालिकेच्या 19 सदस्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. महापौर आणि उपमहापौर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. शिवमोगाच्या जिल्ह्या अध्यक्षांनीही ईश्वरप्पा यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला आहे. याशिवाय इतरही काही नेते राजीनामा देण्यासंदर्भात भाष्य करत आहेत. याशिवाय, जगदीश शेट्टार यांनाही यावेळी भाजपने तिकिट दिलेले नाही.