नवी दिल्ली - भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांना दिल्लीच्या अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून काही वेळाने मेडिकल बुलेटिन जारी केले जाईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली. लालकृष्ण अडवाणी यांचे वय ९६ वर्ष आहे. मागील ४-५ महिन्यापासून अनेकदा त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. ऑगस्ट २०२४ मध्येही अडवाणी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते.
माहितीनुसार, लालकृष्ण अडवाणी गेल्या काही काळापासून आरोग्याशी निगडीत समस्यांमुळे त्रस्त आहेत. याचवर्षी देशातील सर्वोच्च सन्मान भारतरत्न पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते. लालकृष्ण अडवाणींना प्रकृती कारणास्तव राष्ट्रपती भवनातील कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही त्यामुळे त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार देण्यात आला होता. ८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लालकृष्ण अडवाणी यांच्या वाढदिवशी त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या होत्या.
लालकृष्ण अडवाणी हे भारतीय राजकारणातील प्रमुख व्यक्तींपैकी एक आहेत. लालकृष्ण अडवाणी हे गेल्या १० वर्षांपासून सतेत असलेल्या भाजपाच्या संस्थापक सदस्यांपैकी ते एक आहेत. लालकृष्ण अडवाणी हे दृढनिश्चयी आणि सक्षम नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. अडवाणींचा जन्म ८ नोव्हेंबर १९२७ साली कराची येथे झाला होता. १९४२ साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले.
१९८६ ते १९९० पर्यंत आणि १९९३ ते १९९८ आणि २००४-०५ या कालावधीत लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. पक्षाचे दीर्घ काळ अध्यक्षपद सांभाळणारे नेते अशी लालकृष्ण अडवाणी यांची ओळख आहे. त्याशिवाय अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात ते गृहमंत्री आणि देशाचे उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली आहे.