नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज (६७) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराने निधन झालं. सुषमा स्वराज यांना रात्री ९ च्या सुमारास एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. तेथे उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपच्या धडाडीच्या नेत्या म्हणून सुषमा स्वराज यांची वेगळी ओळख होती. सुषमा स्वराज मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात परराष्ट्रमंत्री होत्या. एक ते दीड वर्षापूर्वी त्यांची किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया झाली होती. लोकसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी त्यानंतर जाहीर केला होता. प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही महिन्यांपासून त्या सक्रिय राजकारणापासून दूर होत्या.काश्मीरबाबत केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयानंतर सुषमा स्वराज यांनी मंगळवारीच ट्विट केले होते की, पंतप्रधानजी, आपले हार्दिक अभिनंदन. मी माझ्या आयुष्यात हाच दिवस पाहण्याची प्रतीक्षा करीत होते. विशेष म्हणजे, या ट्विटनंतर काही तासांतच म्हणजेच रात्री साडेनऊ वाजता हृदयविकारामुळे सुषमा स्वराज यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. त्यांना लगेच अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हर्ष वर्धन आणि भाजपच्या अन्य ज्येष्ठ नेत्यांनी एम्समध्ये धाव घेतली. रात्री उशिरा एम्सने सुषमा स्वराज यांचं निधन झाल्याची माहिती दिली.सुषमा स्वराज यांचा जन्म १४ फेब्रुवारी १९५२ रोजी हरयाणाच्या अंबालामध्ये (तेव्हाचे पंजाब) झाला. अंबालाच्या महाविद्यालयातून त्यांनी संस्कृत आणि राज्यशास्त्रात पदवी मिळविली होती. त्यानंतर त्यांनी पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळविली. १९७३ मध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयात वकिली सुरूकेली. १९७५ मध्ये त्यांचा विवाह स्वराज कौशल यांच्याशी झाला. बांसुरी ही त्यांची मुलगी. लंडनमध्ये ती वकिली करते.
Sushma Swaraj Passes Away: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2019 11:15 PM