नवी दिल्ली : माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता अरुण जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
एम्स रुग्णालयात अरुण जेटली यांच्यावर अँडिओक्रोनोलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्टचे एक पथक उपचार करत आहे. अरुण जेटली यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर डॉक्टरांच्या निगरानीखाली अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे एम्स रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान, अरुण जेटली यांची प्रकृती बिघडल्याचे समजल्यानंतर त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि डॉ. हर्षवर्धन एम्स रुग्णालयात पोहोचले आहेत.
अरुण जेटली यांना मोदी सरकार- 1 मध्ये अर्थमंत्री असताना कॅन्सर झाल्याचे निदान झाले होते. त्यानंतर उपचारासाठी ते अमेरिकेला गेले होते. मात्र, अमेरिकेहून भारतात परतल्यानंतरही त्यांची प्रकृती बरी राहत नसल्यामुळे त्यांनी मोदी सरकार -2 मध्ये मंत्रीपद घ्यायला नकार दिला होता.
दरम्यान, गेल्या लोकसभा निवडणुकीत प्रकृती बरी नसतानाही अरुण जेटली यांनी भाजपाच्या प्रमुख रणनीतिकाराची भूमिका पार पाडली. निवडणुकीत प्रचंड बहुमत मिळाल्यानंतरही अरुण जेटली यांनी सरकार स्थापन व्हायच्या आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माझा मंत्रिमंडळात समावेश करू नका, असा आग्रह पत्र लिहून केला होता.
(कुठलंही मंत्रिपद नको; अरुण जेटलींची 'व्हीआरएस', नरेंद्र मोदींना पाठवलं पत्र)