माजी परराष्ट्र मंत्री नटवर सिंह यांचे निधन; मुत्सद्देगिरी, परराष्ट्र धोरणात महत्वाचे योगदान
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 10:30 AM2024-08-11T10:30:15+5:302024-08-11T10:30:59+5:30
नटवर सिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
देशात आणीबाणी आणि ऑपरेशन ब्लू स्टारसाठी लष्कराला परवानगी देणे या दोन चुका इंदिरा गांधींनी केल्या असे परखडपणे मांडणारे देशाचे माजी परराष्ट्र मंत्री के. नटवर सिंह यांचे शनिवारी रात्री प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
नटवर सिंह हे 93 वर्षांचे होते. नटवर सिंह यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. 'नटवर सिंह यांच्या निधनाने मला दु:ख झाले आहे. मुत्सद्देगिरी आणि परराष्ट्र धोरणात त्यांनी भरीव योगदान दिले. ते त्यांच्या बुद्धिमत्तेसोबतच उत्कृष्ट लेखनासाठीही ओळखले जात होते. या दु:खाच्या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत.', असे मोदी म्हणाले.
जुलै 2005 च्या भारत-अमेरिका अणुकरारात सिंह यांची महत्वाची भुमिका होती. त्यांनी चीन, अमेरिका आदींच्या सबंधांवरून लिहिलेली पुस्तकेही मुत्सद्देगिरीची साक्ष देतात. इंदिरा गांधी यांच्या कार्यालयामध्ये १९६६ ते १९७१ या कालावधीत सनदी अधिकारी म्हणून नटवर सिंह यांनी काम केले होते. ८० च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते होते. यूपीएच्या काळात डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते.
काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी देखील के. नटवर सिंह यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. नटवर सिंह यांच्यावर गुरुग्राममधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. सिंह हे राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांनी मेयो कॉलेज, अजमेर आणि सिंधिया स्कूल, ग्वाल्हेर येथे शिक्षण घेतले होते.