नवी दिल्ली: कोरोना साथीचा मुकाबला करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार कमी पडले आहे, अशी टीका केंद्र सरकारचे कट्टर समर्थक व अभिनेते अनुपम खेर यांनी केली आहे. स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्यापेक्षा आयुष्यात आणखीही महत्त्वाची कामे असतात, असा टोला देखील अनुपम खेर यांनी मोदी सरकारला लगावला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने ऑक्सिजनपासून व्हेंटिलेटर्स आणि औषधांचा तुटवडा निर्माण झाला असून रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहे. देशभरातील अनेक राज्यांमध्ये हीच परिस्थिती दिसून येत आहे. अनेकांनी यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवर आफला राग व्यक्त केला आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीमधील अनेक दोषांसाठी सरकारची धोरणं जबाबदार असल्याचं सांगत सोशल नेटवर्किंगवरुन सरकावर निशाणा साधला जात आहे. मात्र याचदरम्यान केंद्र सरकारवर होत असणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये अभिनेते आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटचे (एफटीआयआय) माजी अध्यक्ष गजेंद्र चौहान यांनीही उडी घेतली आहे.
अभिनेते गजेंद्र चौहान यांनी म्हटले आहे की, गाय भलेही आपल्या मालकावर नाराज असेल; पण म्हणून काही ती कसायाच्या घरी जात नाही, असं महाभारत मालिकेत धर्मराजाची भूमिका साकारणारे गजेंद्र चौहान यांनी ट्विट करत म्हटलं आहे. गजेंद्र चौहान यांचं हे ट्विट दोन हजार ७०० हून अधिक वेळा रिट्विट झालं आहे. तर १३ हजार जणांनी ते लाईक केलं आहे.
दरम्यान, अनुपम खेर यांनी देखील कोरोनामुळे नागरिकांचे होणारे हाल पाहून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्याने त्यांचे होणारे हाल, त्यामुळे नातेवाइकांची होणारी घालमेल, कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून दिल्याचा उघडकीस आलेला प्रकार या घटनांनी देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्या पार्श्वभूमीवर अनुपम खेर म्हणाले की, केवळ असंवेदनशील व्यक्तीच अशा घटनांनी हेलावणार नाही. कोरोना रुग्णांचे मृतदेह नदीच्या प्रवाहात सोडून देणे ही घटना भीषण आहे. मात्र, इतर राजकीय पक्षांनी या घटनेचा राजकीय स्वार्थासाठी वापर करणे हेदेखील अयोग्य आहे, असं अनुपम खेर यांनी म्हटलं आहे.
देशात ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण-
देशात गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ६२ हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले व ४१२० जणांचा मृत्यू झाला. बुधवारची आकडेवारी लक्षात घेता नव्या रुग्णांच्या संख्येत गुुरुवारी १४ हजारांनी वाढ झाली व मृतांच्या संख्येत काहीशी घट झाली आहे. गेल्या चोवीस तासात ३ लाख ५२ हजार रुग्ण बरे झाले. कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ३७ लाखांपेक्षा अधिक झाली असून त्यातील १ कोटी ९७ लाख जण आजवर कोरोनामुक्त झाले.
बुधवारी कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ३ लाख ४८ हजार होती व ४२०५ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार देशात गुरुवारी ३६२७२७ नवे कोरोना रुग्ण आढळले व ३५,२१८१ जण बरे झाले. कोरोना रुग्णांंची एकूण संख्या २,३७,०३,६६५ असून त्यातील १,९७,३४,८२३ जण बरे झाले.