"कंगना राजकारणात अल्पवयीन, अपरिपक्व..."; सत्यपाल मलिक यांनी केलं राहुल गांधींचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 08:06 PM2024-09-01T20:06:03+5:302024-09-01T20:06:32+5:30
सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली.
हरियाणातील कर्नाल येथील गुरुद्वारामध्ये आयोजित शीख संमेलनात माजी उपराज्यपाल सत्यपाल मलिक आणि काँग्रेस नेते जगदीश सिंह झिंडा यांनीही भाग घेतला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मलिक म्हणाले की, "कंगना राणौत राजकारणात अल्पवयीन आणि अपरिपक्व आहे. ती विनाकारण वाद निर्माण करते. भारतीय जनता पक्षाने तिची पक्षातून हकालपट्टी करावी."
कार्यक्रमादरम्यान सत्यपाल मलिक यांनी शीख समुदायाच्या आत्मनिर्भरतेची प्रशंसा केली आणि सरकारी हस्तक्षेपाबद्दल चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "सरकारने शीख समाजाच्या कामात हस्तक्षेप करू नये. सरकार आपल्या कामात यशस्वी होत नाही, मग ते रस्ते दुरुस्ती असो, कालव्यांची देखभाल असो किंवा शेतीशी संबंधित समस्या असो. शीख समाज आपलं काम उत्कृष्टपणे करत आहे."
मलिक यांनी जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरही चिंता व्यक्त केली. "जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती अत्यंत बिकट आहे. माझ्या कार्यकाळात कोणीही श्रीनगरच्या जवळही जात नसे. आता परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे." शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मलिक म्हणाले, "शेतकरी सातत्याने आंदोलन करत आहेत. त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला माझा पाठिंबा आहे कारण त्यांच्या मागण्या न्याय्य आहेत" असं म्हटलं आहे.
मलिक यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचंही कौतुक केलं. राहुल गांधी अतिशय शांत आणि विनम्र आहेत असं म्हटलं. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले, "मोदी सरकार तिसऱ्यांदा स्थापन झाले आहे, पण ज्या भागात शेतकरी आंदोलन झाले, तेथे त्यांचा पराभव झाला. मोदी सरकारला सत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांचा एकमेव अजेंडा भ्रष्टाचार करणं, पैसा कमवणं आणि सत्तेत राहणं आहे."