काँग्रेस हायकमांडने राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांना पदाचा राजीनामा देण्यास सांगितले आहे. यामुळे सध्या पक्षात जबरदस्त घमासान सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गेहलोत आज सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेणार आहेत. यातच, गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी मोठा खुलासा करत, आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगताच पदाचा राजीनामा दिला होता, असे म्हटले आहे.
एका फोनवर विजय रुपाणी यांनी दिला होता राजीनामा -गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत यासंदर्भात खुलासा केला आहे. रुपानी यांनी सांगितले, की "एक दिवस आधी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांकडून मेसेज मिळाला होता. यानंतर त्यांनी 11 सप्टेंबर 2021 ला गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता."
विजय रुपाणी यांना पद सोडताना कारणही सांगितलं नव्हतं - गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, पद सोडताना आपल्याला पक्षाकडून कुठल्याही प्रकारचे कारण सांगण्यात आले नव्हते आणि आपणही पक्षाकडे यासंदर्भात विचारणा केली नव्हती. याचवेळी, पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता असल्याचे सांगत रुपाणी म्हणाले की, पक्षाने आपल्याला ज्या-ज्या वेळी जी-जी जबाबदारी दिली, ती आपण पूर्णपणे पार पाडली आहे.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या सत्तासंघर्षाशी होतेय तुलना - विजय रुपाणी (Vijay Rupani) यांनी केलेल्या या खुलाशानंतर, याची तुलना राजस्थानमध्ये सुरू असलेल्या ताज्या सत्तासंघर्षाशी होत आहे. येथे काँग्रेस पक्ष श्रेष्ठींनी गेहलोतांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास सांगितल्यानंतर घमासान सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसने अशोक गेहलोतांना प्रमोशन देऊन पक्षाचे वरिष्ठ पद देण्याचे आश्वासनही दिले आहे. मात्र, असे असतानाही गेहलोतांचे समर्थक आमदार आणि मंत्री आक्रमक झाले आहेत.