अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत अहमदाबादमध्ये शंकरसिंह वाघेला यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
पूर्वाश्रमीचे भाजपा नेते अशी शंकरसिंह वाघेला यांची ओळख होती. त्याअगोदर त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात स्वत:चे अस्तित्व सिद्ध केले होते. मात्र, 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर त्यांनी भाजपाशी जवळीक साधली. आता स्वत:चे राजकीय अस्तित्व वाचविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. शंकरसिंह वाघेला हे गुजरात राज्यातील राजकारणातील अत्यंत मोठे नेते आहेत. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर गुजरातमधील राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढेल, हे निश्चित.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकांपूर्वी शंकरसिंह वाघेला यांनी स्वत:चा नवीन पक्ष स्थापन केला होता. मात्र, त्यांच्या पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही. तसेच भाजपामधूनही ते अधिकृतपणे बाहेर पडले आहेत. त्यामुळे स्वत:चे आणि मुलाचे राजकीय करिअर वाचविण्यासाठी ते घड्याळाचे टायमिंग साधणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला याचा किती फायदा होणार हे आगामी लोकसभा निवडणुकीत पाहता येईल.