Abhijit Gangopadhyay Joins BJP: कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी गुरूवारी भाजपामध्ये प्रवेश केला. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालमधील शाळा भरती घोटाळ्यासारख्या संवेदनशील प्रकरणांच्या सुनावणीचे काम पाहिले होते. अभिजित गंगोपाध्याय यांनी सांगितले होते की, मंगळवारी ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा पाठवणार आहेत. त्यानुसार त्यांनी आपल्या न्यायमूर्तीपदाचा राजीनामा देत, राजकारणात प्रवेश केला. भाजपाचे बंगालचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार आणि विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर लगेचच गंगोपाध्याय यांनी संदेशखाली प्रकरणावर आपले रोखठोक मत व्यक्त केले. "मी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, ते अतिशय छान होते. राज्यातील प्रत्येकालाच माहिती आहे की आपल्याला भ्रष्टाचाराशी दोन हात करायचे आहेत. संदेशखाली मध्ये जे घडलं ती खूप वाईट घटना आहे. राज्याचे काही नेतेमंडळी तिथे गेले होते पण त्यांना तिथे पोहोचण्यापासून रोखले गेले. तरीही भाजपा नेते तेथे पोहोचले आणि आता भाजपा तेथील महिलांच्या पाठीशी उभे ठामपणे उभा आहे."
"भाजप प्रदेशाध्यक्ष या नात्याने मी माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांचे आमच्या पक्षात, नरेंद्र मोदी यांच्या कुटुंबात स्वागत करतो. त्यांनी ज्या प्रकारे वंचित, शोषित पीडितांसाठी न्यायमूर्ती म्हणून काम केले त्यावर माझा विश्वास आहे. हेच विधायक काम ते भाजपच्या नेतृत्वासोबत पुढे नेतील. आगामी काळात बंगालच्या राजकारणाला कलाटणी मिळेल. बंगालच्या सुशिक्षित तरुणांनी पुढे येऊन राज्याच्या राजकारणाच्या जडणघडणीत सहकार्य केले पाहिजे. राज्याच्या विकासाला हातभार लावण्याची हीच योग्य वेळ आहे," असे पक्षप्रवेशावेळी पश्चिम बंगाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार म्हणाले.