ऑनलाइन लोकमत
रोहतक, दि. 1 - सुकूमा हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलणा-या भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरच्या पावलावर पाऊल ठेवत माजी हॉकी खेळाडू अजीत पाल नांदल यांनी हरियाणामधील 21 मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे. नांदल यांनी बुधवारी रोहतक जिल्ह्यामधील बोहर गावातील या मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची घोषणा केली. या सर्व मुली सहावी ते बारावीच्या इयत्तेत शिकत असून सरकारी शाळेच्या विद्यार्थिनी आहेत.
नांदल यांनी सांगितलं की, "आपण फक्त या मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार नाही, तर त्यांना खेळाचं प्रशिक्षणही देणार आहोत". क्रिडा स्पर्धांसाठी या मुलींच्या फीसोबत गरज लागणारं सर्व सामान उपलब्ध करुन देण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं आहे. या मुलींच्या बारावीपर्यंतच्या शिक्षणाचा खर्च अजीत पाल नांदल उचलणार आहेत.
आर्थिक परिस्थिती नाजूक असलेल्या शाळेत शिकणा-या 21 मुलींची शाळेने यादी केली होती. नांदल रोहतकमध्ये एक व्यायामशाळा चालवतात. "शाळेतील दुस-या मुलींनीही जर खेळात रस दाखवला तर त्यांना व्यायामशाळेत मोफत सुविधा पुरवल्या जातील", असं त्यांनी सांगितलं आहे. "मुलींना दत्तक घेण्याची प्रेरणा आपल्याला गौतम गंभीरपासून मिळाल्याचं", नांदल यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, 2020 टोकियो ऑलिम्पिकच्या तयारीसाठी पंतप्रधान मोदींनी जी टास्क फोर्स तयार केली आहे त्यामध्ये त्यांचाही समावेश आहे.
नांदल यांनी ज्या कार्यक्रमात मुलींना दत्तक घेण्याची घोषणा केली त्या कार्यक्रमासाठी रोहतकचे एसपी पंकज नैन मुख्य पाहुणे होते. नैन यांनी सांगितलं की, "या मुलींकडे 10 टक्के जास्त क्षमता आहे. त्यांच्यातील टॅलेंटची ओळख पटवणं आणि योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे. जिल्हा पोलिसांनीही बोहर गावाला दत्तक घेतलं असून तरुणांना योग्य दिशा दाखवत आहे".