भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीरने पोलिसांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनोबल वाढवणारे भाषण केले. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर गंभीरने राजकीय खेळी सुरू केली आणि तो २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतून भाजपच्या तिकिटावर निवडून आला. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेल्या गंभीरने समाजासाठी योगदान आणि बलिदान देणाऱ्या पोलीस बांधवांचे आभार मानले. गंभीरने सोशल मीडियावर त्याच्या भाषणाची झलक शेअर केली आहे. यामध्ये तो क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभात पोलिसांच्या कार्याला दाद देताना दिसतो. २०११ च्या वन डे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध ९७ धावा करून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणारा गंभीर २०१९ पासून भारतीय जनता पक्षामध्ये सामील झाला. त्याने पूर्व दिल्लीतून लोकसभेची निवडणूक जिंकली अन् खासदार होण्याचा मान पटकावला. २०२२ आणि २०२३ मध्ये तो आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या संघाचा मार्गदर्शक होता. आगामी आयपीएल हंगामासाठी त्याची कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात घरवापसी झाली आहे.
दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या कार्यक्रमात गौतम गंभीरला आमंत्रित करण्यात आले होते. पोलीस हेच भारताचे खरे हिरो आहेत, असे प्रतिपादन करताना गंभीरने पोलिसांच्या बलिदानाबद्दल त्यांचे आभार मानले. पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, "पोलिसांनी कोणत्याही नेत्याला अथवा खासदाराला सलाम करण्याची गरज नाही, तर आम्हीच तुम्हाला सलाम केला पाहिजे कारण तुम्ही खऱ्या अर्थाने त्याग करता."
"पोलीस सर्वात मोठे हिरो, त्यांची वर्दी हीच देशाची ताकद"उपस्थितांना संबोधित करताना गंभीर म्हणाला की, मला एक गोष्ट समजत नाही की, जेव्हा एखादा खासदार किंवा राजकारणी येतो तेव्हा पोलीस बांधव त्यांना सलाम करतात. यामध्ये कधी बदल होईल मला माहिती नाही. खरं तर सर्वकाही याउलट व्हायला हवे. राजकारण्यांनी तुम्हाला सलाम केला पाहिजे. कोणताही राजकारणी किंवा बॉलिवूड अभिनेता तुमच्यासारखा त्याग करत नाही. पोलिसांना त्यांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी आणि होळी साजरी करता येत नाही. कारण जनतेला हे सण साजरे करता यावेत. तुम्ही पोलीस बांधव आपल्या देशाचे सर्वात मोठे हिरो आहात आणि तुमची वर्दी ही देशाची सर्वात मोठी ताकद आहे. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानू इच्छितो.