Cricketer Anshuman Gaekwad ( Marathi News ) : भारताचे दिग्गज माजी क्रिकेटपटू अंशुमन गायकवाड यांचं बुधवारी सायंकाळी निधन झालं आहे. ते ७१ वर्षांचे होते. ब्लड कॅन्सरने ग्रासल्यानंतर गायकवाड यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र कॅन्सरसोबत सुरू असलेली गायकवाड यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सरने ग्रासल्यानंतर त्यांच्यावर लंडन येथील किंग्ज कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत होते. त्यानंतर मागील महिन्यातच त्यांना भारतात आणण्यात आलं. कॅन्सरवरील महागडे उपचार लक्षात घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी गायकवाड यांच्या उपचारासाठी १ कोटी रुपयांचा निधी दिला होता. तसंच १९८३ सालच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाकडूनही त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली होती. मात्र काही दिवसांतच त्यांचा आजार आणखीनच बळावला आणि बुधवारी सायंकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
गायकवाड यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत म्हटलं आहे की, "श्री. अंशुमन गायकवाड यांचे क्रिकेटमधील योगदान कायमच स्मरणात राहील. ते एक उत्कृष्ट खेळाडू आणि चांगले प्रशिक्षक होते. त्यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दु:ख झाले. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दु:खात मी सहभागी आहे," अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी अंशुमन गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यासह क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गजांनी अंशुमन गायकवाड यांच्या निधनानंतर शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे.
गायकवाड यांचे क्रिकेट करिअर
अंशुमन गायकवाड यांनी भारताकडून ४० कसोटी आणि १५ एकदिवस सामने खेळले आहेत. तसंच २००० साली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपविजेतेपदावर नाव कोरलेल्या भारतीय संघाचे ते प्रशिक्षकही होते. गायकवाड यांनी आपल्या २२ वर्षीय क्रिकेट कारकीर्दीत २०५ प्रथम श्रेणी सामनेही खेळले आहेत.