delhi floods 2023 । नवी दिल्ली : सध्या देशाची राजधानी दिल्लीवर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. दिल्लीतील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणाच पाणी साचल्याचे चित्र आहे. यावरून आता राजकारण चांगलेच तापले असून सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपाला दोषी ठरवले आहे तर भाजपा खासदार गौतम गंभीरने सत्ताधारी 'आप'वर सडकून टीका केली. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी शहरातील पायाभूत सुविधांवर किती पैसा खर्च झाला हे सांगावे, असे आवाहन गंभीरने केले आहे. याशिवाय विरोधकांच्या कोणत्याही बैठकीला अथवा युतीला भारतीय जनता पार्टी घाबरत नसल्याचे त्याने म्हटले आहे.
गौतम गंभीर माध्यमांशी संवाद साधत असताना त्याला विरोधकांच्या बैठकीबद्दल प्रश्न विचारला असता त्याने म्हटले, "देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकजुट होण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा त्यांनी चांगली मेहनत करावी. आगामी पंतप्रधान कोण असेल हे जनता ठरवेल आणि आम्ही त्यासाठी मेहनत घेत आहोत. भाजपा ना कोणत्या युतीशी घाबरली आहे ना भविष्यात घाबरेल."
'आप'वर टीकास्त्रदिल्लीत ओल्या दुष्काळाचे सावट पाहता गंभीरने सत्ताधारी आम आदमी पार्टीवर टीका केली. "दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना दिल्लीतील जनतेला सांगावे लागेल की शहरातील पायाभूत सुविधांवर किती पैसा खर्च झाला आणि किती पैसा जाहिरातींवर खर्च केला गेला. दिल्लीला वाचवण्याची जबाबदारी आमची आहे", अशा शब्दांत गंभीरने अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला.
दिल्लीत पावसाची बॅटिंग अन् राजकारण तापलेउत्तर भारतात मुसळधार पावसामुळे महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरयाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे.