चेन्नई : भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू आणि समालोचक लक्ष्मण शिवरामकृष्णन आता राजकीय पीचवर आपले नशीब आजमावणार आहेत. चेन्नई येथे भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश करून लक्ष्मण शिवरामकृष्णन यांनी राजकारणात प्रवेश करून नवी इनिंग सुरू केली आहे. शिवरामकृष्णन यांच्या पक्ष प्रवेशावेळी तामिळनाडूचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. टी. राव उपस्थित होते.
माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन यांच्या भाजप प्रवेशाबद्दल प्रदेशाध्यक्ष सी. टी. राव यांनी आनंद व्यक्त केला आहे. सी. टी. राव यांनी दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेश न करण्यावर प्रतिक्रिया दिली. रजनीकांत यांच्या पक्ष न स्थापन करण्याच्या निर्णयावर बोलताना ते म्हणाले की, रजनीकांत हे दिग्गज नेते आहेत. आम्ही सर्वजण त्यांचा आदर करतो. रजनीकांत तामिळनाडू आणि देशहिताच्या बाजून नेहमी उभे राहतात. जनतेच्या हितावर त्यांचा नेहमी भर असतो, असे ते म्हणाले.
दरम्यान, रजनीकांत यांना नुकताच रुग्णालयातून डिस्चार्ड देण्यात आला आहे. रजनीकांत यांनी तब्येतीच्या कारणास्तव राजकीय पक्षाची स्थापना आणि राजकारणातील प्रवेशाबाबत नकार दिला. रजनीकांत यांना काही दिवसांपूर्वी उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लक्ष्मण शिवरामकृष्णन यांची कारकीर्द
लक्ष्मण शिवरामकृष्ण यांनी भारताकडून ९ कसोटी आणि १६ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यांनी कसोटीत २६ तर एकदिवसीय सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. दुसरीकडे, क्रिकेट आणि राजकारणाचा गेल्या काही वर्षांपासून अधिक संबंध येत असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी राजकारणात प्रवेश केला आहे. यात गौतम गंभीर, नवज्योत सिंह सिद्धू, कीर्ती आझाद, विनोद कांबळी यांसारख्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे.