नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार प्रबोध तिर्की यांनी सोमवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांनी आज ओडिशाच्या काँग्रेस भवनात झालेल्या मेळाव्याला हजेरी लावली. प्रबोध यांच्यासोबत एकमरा मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते प्रसन्नकुमार चंपती यांनीही काँग्रेसचा झेंडा हाती घेतला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरत पटनायक यांसह राज्यातील नेते उपस्थित होते.
आर्थिक संकटातून मोठ्या उंचीपर्यंतचा प्रवासउल्लेखनीय बाब म्हणजे प्रबोध तिर्की यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९८४ रोजी बालीशंकरा भागात असलेल्या लुलुकीडीही या हॉकी गावात एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. अनेक अडचणी असूनही प्रबोध यांनी त्यांचा मोठा भाऊ इग्नेस तिर्की यांच्यासोबत हॉकी खेळण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या वडिलांना हॉकी स्टिक विकत घेणे शक्य नसल्याने ते बांबूच्या काठीने हॉकीचा सराव करत असत. त्यांच्यासाठी गावातील रस्ता म्हणजे हॉकीचे मैदान होते. बांबूची काठी आणि गावाकडच्या वाटेने प्रवास सुरू करणाऱ्या इग्नेश आणि प्रबोध यांनी पुढे भारतीय हॉकी संघात महत्त्वाचे स्थान निर्माण करून राज्य आणि देश पातळीवर नाव कमावले.
राजकीय खेळीची घोषणाप्रबोध तिर्की यांनी भारतीय हॉकी संघाचे कर्णधारपदही भूषवले आहे. २००७ मध्ये आशिया चषक विजेत्या संघाचे ते सदस्य होते. १६१ आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या प्रबोध यांना एकलव्य पुरस्कार आणि बिजू पटनायक राज्य क्रीडा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हॉकी खेळल्यानंतर त्यांनी पुढील १८ वर्षे एअर इंडियामध्ये काम केले. मग त्यांनी ३१ जुलै रोजी नोकरीला रामराम करण्याचा निर्णय घेतला अन् आपले गाव गाठले. आता त्यांनी काँग्रेसचा हात धरून आपली राजकीय खेळी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.