उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्या मंत्रिमंडळात माजी आयपीएस अधिकारी असीम अरुण यांचा समावेश करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्यासह एकूण ५२ आमदारांना उत्तर प्रदेशच्या राजपालांनी आज मंत्रिपद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यात माजी आयपीएल अधिकारी आणि विधानसभा निवडणुकीत निवडून आलेले असीम अरुण यांना राज्यमंत्रीपद (स्वतंत्र प्रभार) सोपवण्यात आलं. राजकारणात प्रवेश करताच त्यांचं नशीब फळफळलं आहे. या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर दोन प्रशासकीय अधिकारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. ज्यामध्ये माजी आयपीएस असीम अरुण आणि एन्काउंटर स्पेशालिस्ट राजेश्वर सिंह यांच्या नावाचा समावेश होता. निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीच असीम अरुण यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपनं त्यांना कन्नौजमधून उमेदवारी दिली होती. असीम अरुण कन्नौज मतदारसंघातून ६१६३ मतांनी विजयी झाले.
असीम अरुण यांना योगी सरकारच्या नव्या मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं आहे. यावेळी योगी मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला असून त्यात असीम अरुण यांच्या नावाचाही समावेश आहे. उत्तर प्रदेशातील २०२२ च्या विधानसभा निवडणुकीचे निकाल धक्कादायक होते. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्यासह ११ मंत्री निवडणुकीत पराभूत झाले, तरीही योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भाजपला राज्यात पूर्ण बहुमत मिळालं. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकारची दुसरी टर्म सुरू झाली आहे. केशव प्रसाद मौर्य यांच्या व्यतिरिक्त पक्षानं पराभूत झालेल्या मंत्र्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिलेलं नाही. उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचं राजकीय वजन पाहून त्यांना पुन्हा एकदा थेट उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं आहे.
कोण आहेत असीम अरुण?असीम अरुण हे कन्नौज जिल्ह्यातील थथिया पोलीस स्टेशन परिसरातील मजरा गौरनपुरवा येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९७० रोजी बदाऊन येथे झाला. असीम अरुण हे १९९४ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्यांचे वडील श्री राम अरुण हे देखील आयपीएस अधिकारी राहिले आहेत. त्यांनी राज्यात दहशतवादी विरोधी पथकाची स्थापना केली होती. ते राज्याचे डीजीपीही राहिले आहेत. असीम अरुण राजकारणात येण्यापूर्वी कानपूरचे पहिले पोलीस आयुक्त होते. कानपूर आयुक्तालय झाल्यानंतर, असीम अरुण यांनी २५ मार्च २०२१ रोजी पहिले पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला. याआधी ते डायल ११२ चे प्रभारी म्हणून २ वर्षे कार्यरत होते. त्याचवेळी त्यांना दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणूनही नियुक्त करण्यात आलं होतं. असीम अरुण हाथरस, बलरामपूर, गोरखपूर, अलीगढ, सिद्धार्थनगरसह अनेक जिल्ह्यांचे पोलिस अधिक्षक राहिले आहेत.