श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांची केंद्र सरकार सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली करण्यात आलेल्या स्थानबद्धतेतून सुटका करण्याची शक्यता आहे.या आधी माजी मुख्यमंत्री व नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुक अब्दुल्ला व त्यांचे चिरंजीव व राज्याचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची याच कायद्याखाली झालेल्या स्थानबद्धतेतून सुटका केली गेलेली आहे. मुफ्ती या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) अध्यक्षही आहेत.मेहबुबा मुफ्ती यांच्या संभाव्य सुटकेच्या बातम्यांवर प्रतिक्रिया व्यक्त करताना मुफ्ती यांच्या टिष्ट्वटर हँडलने (ते त्यांची कन्या चालवते) म्हटले की, ‘‘माझी आई तिच्या नियोजित सुटकेची वृत्ते ऐकत आहे; परंतु जम्मू आणि काश्मीरच्या बाहेर जे हजारो तरुण मुले तुरुंगांत आहेत त्यांच्याबद्दल तिला काळजी वाटते. कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे त्या तरुणांच्या कुटुंबियांना वाटणाऱ्या भीतीची आपण कल्पनाही करू शकत नाही. ती घरापासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर असली तरी ती मुले त्यांच्या कुटुंबांपासून व घरांपासून शेकडो मैल दूर आहेत. या सगळ्या स्थानबद्धांची ताबडतोब सुटका करावी, अशी विनंती तिला पंतप्रधानांना करायला आवडेल.’’मेहबुबा मुफ्ती यांची सुटका करण्याच्या मागणीला ओमर अब्दुल्ला यांनीही पाठिंबा दिला. अब्दुल्ला टिष्ट्वटरवर म्हणाले की, मेहबुबा मुफ्ती आणि इतरांना अशा परिस्थितीत सतत स्थानबद्ध करणे हे क्रूर आणि निष्ठूर आहे. मुळात प्रत्येकाला स्थानबद्ध करून ठेवण्याचे समर्थन कधीच होऊ शकत नाही.फेब्रुवारीपासून केले आहे स्थानबद्धजम्मू आणि काश्मीर प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला यांना सार्वजनिक सुरक्षा कायद्याखाली स्थानबद्ध करून ठेवले होते. जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा दिलेला घटनेतील अनुच्छेद ३७० गेल्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी रद्द केल्यानंतर फारुक अब्दुल्ला, ओमर अब्दुल्ला व मेहबुबा मुफ्ती यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांना स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते. ओमर अब्दुल्ला यांची मंगळवारी तर फारुख अब्दुल्ला यांची या महिन्याच्या प्रारंभी स्थानबद्धतेतून सुटका केली गेली.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांचीही सुटका होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2020 1:31 AM