Former Judge Markandey Katju Letter To Supreme Court: सातत्याने वादग्रस्त विधाने करून चर्चेत असलेले तसेच भाजपा व केंद्र सरकार यांचे निर्णय, धोरणांवर टीकास्त्र सोडणाऱ्या माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना एक पत्र लिहिले आहे. माजी आयपीएस अधिकारी संजीव भट्ट, उमर खालिद, प्रोफेसर साईबाबा यांना जेलमधून मुक्त करावे, अशी मागणी मार्कंडेय काटजू यांनी या पत्रातून सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना केली आहे.
माजी न्यायाधीश मार्कंडेय काटजू आपल्या पत्रात म्हणतात की, आदरपूर्वक अपील करतो की, जेलमध्ये असलेल्या काही जणांबाबत न्यायालयाने पूनर्विचार करावा. हे लोक निर्दोष असून, मोदी सरकारच्या राजकीय प्रतिशोधाच्या भावनेमुळे चुकीच्या पद्धतीने कारागृहात डांबले गेले आहे, असे मला वाटते. या लोकांविरोधात खोटे आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप रद्द करून न्यायालयाने त्यांना सोडून देण्याचे आदेश द्यावेत.
मार्कंडेय काटजू यांना कोणाकोणाला जेलमधून मुक्त करण्याची मागणी केली आहे?
- मार्कंडेय काटजू आपल्या पत्रात म्हणतात की, संजीव भट्ट हे वरिष्ठ आयपीएस पोलीस अधिकारी होते. गुजरात सरकारने १९९६ च्या जुन्या खटल्यात त्यांना खोट्या आरोपाखाली अटक करून दोषी ठरवले. २०१८ पासून संजीव भट्ट तुरुंगात आहेत. त्याला नोकरीतूनही बडतर्फ करण्यात आले असून, त्याचा व त्याच्या कुटुंबीयांचा अनेक प्रकारे छळ करण्यात आला आहे, असा आरोप काटजू यांनी या पत्रातून केला आहे.
- पुढे काटजू लिहितात की, उमर खालिदने जेएनयूमधून पीएचडी पदवी मिळवली आहे. उमर खालिद सामाजिक कार्यकर्ता होते. यूएपीए आणि आयपीसीतील अनेक कलमांसह देशद्रोहाच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. हे सर्व पूर्णपणे बनावट आणि खोटे आहे. २०२० पासून उमर खालिद जेलमध्ये आहे. त्यांचा खरा गुन्हा मुस्लिम असणे हा आहे. जेएनयूमधील याच घटनेत कन्हैया कुमारवरही असेच आरोप करण्यात आले होते. हिंदू असल्याने त्याची मुक्तता करण्यात आली, असा मोठा दावा काटजू यांनी केला आहे.
- भीमा कोरेगावच्या आरोपींवरील सर्व आरोप खोटे असल्याचे दिसून येत आहे. ते आरोप रद्द केले गेले पाहिजेत. भारतातील मानवाधिकार कार्यकर्त्यांवरील आरोप त्वरित रद्द करण्यात यावे. मोदी सरकारने अनेकदा त्यांच्याविरोधात टीका करणाऱ्यांना अटक केली आहे. लोकशाहीत सरकारवर टीका करणे हा जनतेचा अधिकार आहे, असेही काटजू यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
- प्रोफेसर साईबाबांच्या प्रकरणाचा फेरविचार व्हायला हवा. प्रोफेसर साईबाब यांच्यावरील सर्व आरोप रद्द व्हायला हवेत. कारण ते पूर्णपणे निर्दोष असल्याचे दिसून येत असून, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी तयार केलेले पुरावे चुकीचे आहेत, असे काटजू यांनी पत्रात लिहिले आहे.
- दहशतवाद, देशद्रोह, UAPA अशा खोट्या आरोपांखाली मोठ्या संख्येने निरपराध मुस्लीम समाजातील अनेक जण दीर्घकाळ तुरुंगात आहेत. त्यांचा गुन्हा एवढाच होता की, ते मुस्लीम आहे आणि मोदी त्यांचा तिरस्कार करतात, या शब्दांत मार्कंडेय काटजू यांनी पत्रातून मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.