मुंबई: महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. तसेच तिन्ही पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रमाबाबतही एकमत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत न जाता भाजपासोबत जाण्याचा सल्ला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी काँग्रेसला दिला आहे.
कुमारस्वामी म्हणाले की, शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर जास्त प्रमाणात आक्रमक असून भाजपाचं हिंदुत्व थोडं मवाळ आहे. त्यामुळे काँग्रेसनं भाजपासोबत जाणं अधिक सोयीचं ठरेल असं मत कुमारस्वामी यांनी व्यक्त केलं आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सातत्याने चर्चा सुरू आहे. त्यातच आज (सोमवारी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेतली. मात्र या भेटीनंतर सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नसल्याचे शरद पवार यांनी सांगितल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा पेच आणखी वाढला आहे.
पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. आम्ही राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत असं सांगितल्याने पत्रकार परिषदेत हास्यकल्लोळ झाला.
राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या समन्वय समितीची बैठक झाली यात कॉमन मिनिमम प्रॉग्रामवर चर्चा झाली असल्याचं सांगण्यात आलं मात्र पवारांनी या प्रश्नावर दिलेल्या उत्तराने सगळेच अवाक् झाले. काही ठरलेलंच नाही, तर कशासाठी 'कॉमन मिनिमम प्रॉग्राम' करू, राज्यातील स्थितीबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभा सदस्य म्हणून ते भेटले होते असा दावा शरद पवारांनी केला त्यामुळे एकसूत्री कार्यक्रम बैठकीत ठरला आहे, मसूदा तयार करण्यात आला आहे त्यानंतर तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मसुद्यावर अंतिम निर्णय घेतील असं सांगण्यात आलं होतं. त्यावर शरद पवारांच्या या विधानामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.