बंगळुरू- कर्नाटकचे माजी डीपीटी एचटी सांगलियान यांचं वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. एका कार्यक्रमात संवाद साधताना माजी डीजीपींची जीभ अक्षरशः घसरली. माजी डीजीपी एचटी सांगलियाना यांनी निर्भयाची आई आशा देवी यांच्याबद्दल बोलताना म्हटलं की, ‘त्यांची शरिरयष्टी पाहिल्यानंतर निर्भया किती सुंदर असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो’, असं वादग्रस्त वक्तव्य सांगलियान यांनी बंगळुरुत महिलांचा सन्मान करण्यासाठी आयोजित एका कार्यक्रमात बोलताना केलं.
2012 मध्ये दिल्लीत निर्भयावर बलात्काराची घटना घडली होती. आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी निर्भयाची आई आशा देवी यांनी अतिशय संघर्ष करत कायदेशीर लढा दिला. त्यांच्याबद्दल बोलताना एचटी सांगलिया यांनी म्हंटलं की, ‘मी निर्भयाच्या आईला पाहू शकतो. त्यांच्याकडे किती चांगली शरिरयष्टी आहे. त्यांच्याकडे पाहूनच निर्भया किती सुंदर असेल याचा अंदाज लावू शकतो’.‘जर तुमच्यावर जबरदस्ती होत असेल तर तुम्ही आत्मसमर्पण केलं पाहिजे. नंतर तुम्ही ती केस फॉलो करा. सुरक्षित राहण्याचा, जीव वाचवण्याचा आणि हत्या रोखण्याचा हा पर्याय आहे’, असंही सांगलियान यांनी म्हंटलं.
माजी डीजीपींचं हे वक्तव्य ऐकल्यानंतर कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना आश्चर्याचा धक्का बसला. या कार्यक्रमात बंगळुरुच्या प्रसिद्ध आयपीएस डी रुपाही उपस्थित होत्या. डी रुपा यांनी कार्यक्रमातील काही फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटला शेअर केले आहेत. या कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्या अनिता चेरिया यांनीही डीजीपींचं वक्तव्य आपल्यासाठी खूप मोठा धक्का होता असं म्हटलं आहे. वक्तव्य ऐकल्यानंतर त्या अर्ध्यातून कार्यक्रम सोडून जाणार होत्या, पण निर्भयाच्या आई-वडिलांचा सन्मान म्हणून त्यांनी असं केलं नाही. ‘जेव्हा पोलीस खात्यातील एक वरिष्ठ अधिकारी जो एका प्रतिष्ठित पदावर होता त्याला असं वक्तव्य करणं शोभत नाही. स्त्रीच्या शरीरयष्टीवर वक्तव्य करणं त्यांना योग्य वाटत असेल तर अशा लोकांची मानसिकता बदलण्यासाठी आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायला लागेल, असं डीजीपींच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत अनिता चेरिया यांनी म्हंटलं.