ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २२ - कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप असलेले दिल्लीचे माजी कायदामंत्री व आम आदमी पक्षाचे नेते सोमनाथ भारती यांचा जामीन अर्ज दिल्ली उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) फेटाळून लावल्याने त्यांना आता कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे.
भारती यांची पत्नी लिपिका मित्रा हिने त्यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप लावला होता. त्यानंतर पोलिसांनी भारती यांच्याविरोधात हत्येचा प्रयत्न, मारहाण, फसवणूकीसह अनेक गुन्हे दाखल केले. गुन्हा दाखल होताच भारती यांनी दिल्ली कनिष्ठ न्यायालयात धाव घेत अटक टाळण्यासाठी याचिका दाखल केली. मात्र न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळत भारतींविरोधात अटक वॉरंट काढले होते. या निर्णयाला भारती यांनी उच्च न्यायालयात आवाहन दिले, त्यावर आज झालेल्यासुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानेही आधीचा निर्णय कायम ठेवत भारतींना दिलासा देण्यास नकार दिला.
न्यायालयाच्या निर्णयानंतर पोलिस आज भारती यांना अटक करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले खरे, पण ते तेथे नसल्याने त्यांना अटक झाली नाही. दरम्यान पोलिसांनी आपल्याशी कोणताही संपर्क साधला नसल्याचे सांगत त्यांच्या कारवाईवर भारती यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तसेच न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आता आपण सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.